वीज गेली, की अनेक जण ‘महावितरण’च्या नावाने खडे फोडायला सुरुवात करतात. याच ‘महावितरण’चे कर्मचारी वेळ आली की भर पावसात, जिवाची बाजी लावतरात्री-अपरात्रीही वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी झटत असतात. याचा प्रत्यय दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरवासीयांना आला. वीज गेल्यावर पाहणी केल्यावर क्रांतीनगर येथे वीजवाहिनीत बिघाड झाल्याचे कर्मचाऱ्यांनी शोधून काढले. दुरुस्तीसाठी त्यांना शिरगाव उपकेंद्राचाही वीजपुरवठा बंद केला. १३ मीटर उंचीच्या वीज खांबावर चढून कर्मचाऱ्याने वीजपुरवठा सुरू केला. रत्नागिरीच्या हार्बर उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या ३३ हजार व्होल्ट वीजवाहिनीमध्ये १३ जूनला रात्री बिघाड झाला होता.
रत्नागिरी शहराला वीजपुरवठा करणारे हार्बर व रहाटाघर उपकेंद्र बंद पडले. त्यामुळे रत्नागिरी शहरामधील हजारो ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. याची सूचना त्या वेळी कार्यरत असलेल्या यंत्रचालकांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिली. रत्नागिरी शहर शाखा अभियंता यांनी तत्काळ उपाययोजना करून पर्यायी मार्गे पुढील २० मिनिटात वीजपुरवठा सुरू केला.