रोहा तालुक्यातील धामणसई हद्दीतील अघोरी जादूटोणा प्रकरण सबंध राज्यात चांगलेचगाजले. अंनिस, राजकीय नेतृत्व, पत्रकार यांचा दबाव वाढताच पैशाचा पाऊस भगतगिरी प्रकरणातील संशयीत मास्टर माईंड किरण धनवी व एका सहकाऱ्याला अखेर शुक्रवारी सकाळी अमानुष व अघोरी प्रथा जादूटोणा गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली आहे. मात्र पैशाचा पाऊस भगतगिरी प्रकरणातील रत्नागिरीतील मुख्य म्होरक्या व त्यांचा साथीदार अजून सापडलेले नाहीत. त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, सामागे राजकीय व अन्य लोक आहेत का, किती लोकांची आर्थिक फसवणूक झाली, नरबळीचे प्रयोजन होता का? अशा अनेक बाबींची अजूनही चर्चा सुरूच आहे.
धामणसई हद्दीत काळया अघोरी विद्येच्या जादूटोणातून पैशाचा पाऊस पाडण्याचे भगतगिरी प्रकरण शनिवारी उघडकीस आले. धामणसई येथील धाडसी तरुणांनी पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विद्येचा प्रयोग केल्याच्या संशयातून आरोपी संतोष पांलाडे, प्रदीप पवार, प्रवीण खांबल, सचिन सावंतदेसाई, दीपक कदम, मिलिंद साळवी (सर्व राहणार रत्नागिरी) व राजेंद्र तेलंगे (राहणार हेटवणे रोहा) यांना पकडून रोहा पोलिसांच्या ताब्यात दिले. याचवेळी भगतगिरीतील म्होरक्या व त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले.
पैशाचा पाऊस पाडण्यासाठी चक्क विद्येचे ठिकाण लहान मुलांची शाळा वापरण्यात आली. शाळेत काळी बाहुली यांसह सर्वच जादूटोण्यातील पुरावे मिळाले. यातील भगत हा शनिवारी रात्री स्मशानात नम्रपुजा करणार होता. त्याचवेळी शाळेत बसलेल्या सर्व आरोपींना पैशाच्या पावसातून रग्गड पैसा मिळणार होता. त्यासाठी आरोपींनी भगतासाठी लाखो रुपये मोजले. हे समोर आले आहे, हे धक्कादायक प्रकरण जिल्हा, राज्यात गाजले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दखल घेतली. पैशाचा पाऊस प्रकरणातील आरोपींना ताब्यात घ्या, नेमका प्रकार काय, शाळेचा वापर का करण्यात आला, असा दबाव पोलिसांवर वाढला.
त्याचवेळी शाळेचा प्रमुख किरण धनवी हा संशयीत म्हणून चर्चेत आला. त्याच्याच बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये पैशाचा पाऊस पाडणारा जालीम भगत काही दिवस राहत होता, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे किरण धनवी प्रत्यक्ष सहभागी असावा, त्यातच अघोरी विद्येसाठी शाळा का वापरायला दिली, अशा सर्वच धागेदोऱ्यांसाठी अखेर शुक्रवारी सकाळी किरण धनवी याला रोहा पोलिसांनी अटक केली, असे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.