रत्नागिरी मिऱ्याबंदर येथे स्थित असलेली भारती शिपयार्ड कंपनी २०१४ पासून ही कंपनी एडेलविस मालमत्ता पुनर्रचनाच्या नियंत्रणाखाली आहे. ११ वर्षापूर्वी बंद पडलेली शहरालगतच्या मिऱ्याबंदर येथील जहाज बांधणी करणारी भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची चर्चा समोर येत आहे. स्थानिक ग्रामस्थ, कामगार, ठेकेदारांनी वर्षभरापूर्वीपासून पत्रकार परिषदेमध्ये तशी मागणीही केली होती.
कंपनीच्या मालमत्तेच्या पुनर्गठनासाठी सुरुवातीला १२०० कोटी देण्याचे ठरले होते; पण प्रत्यक्ष मात्र ३० कोटी रुपयेच देण्यात आले. रत्नागिरीतून १० जहाजांची निर्मिती केली होती. या कंपनीला वॉरशिप बांधायची परवानगी आहे व ही कंपनी देशासाठी उत्कृष्ट जहाजही बनवू शकेल. सध्याच्या घडीला कंपनी सुरू करण्यासाठी ५० कोटींचे आर्थिक बळ मिळाले तर कंपनी नक्की सुरू होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला होता.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन मंत्रालयात महत्वाची बैठक घेतली. यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. यामुळे सुमारे १२०० जणांचा गेलेला रोजगार पुन्हा मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे; परंतु ही प्राथमिक चर्चा असून लवकरच याबाबतचा ठोस निर्णय उद्योगमंत्री जाहीर करणार आहेत. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, रत्नागिरीतील परेश सावंत, निशांत सावंत उपस्थित होते. शहरालगत असलेल्या मिऱ्याबंदर येथे जहाजबांधणी करणारी भारती शिपयार्ड कंपनी, न्यायालयाने कोणत्या तरी चांगल्या कंपनीला कंपनी सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, असेही सांगितले होते. त्यामुळे मंत्रालयात झालेली ही झालेली बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे.
भारती डिफेन्स व इन्फ्रा लिमिटेडपूर्वी भारती शिपयार्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने १९७३ पासून देशभरातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. कंपनीचे एकूण ६ यार्ड आहेत. यापैकी ३ यार्ड हे महाराष्ट्र राज्यात आहेत. आता उद्योगमंत्री सामंत यांनी ही कंपनी सुरू करण्यासंदर्भात गतिमान पावले उचलली आहेत.