शहराजवळील मिऱ्याबंदर येथील भारती शिपयार्ड या दिवाळखोरीत निघालेला जहाजबांधणी प्रकल्पाची मालमत्ता योमन मरीन या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी ‘एनसीएल’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कायमस्वरूपी दगडी कंपाउंड आणि गेट उभारले आहेत. परंतु, काही ग्रामस्थांनी दमदाटी करून बळजबरीने हे गेट उघडण्यास भाग पाडले. त्यामुळे शांतता व सुरक्षितता प्रश्न निर्माण झाला आहे. हिच स्थिती यापुढेही कायम राहिल्यास प्रकल्प उभारणी कामासंदर्भात कंपनीला नकारात्मक निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा देणारे पत्र कंपनीने सडामिऱ्या ग्रामपंचायतीलाला दिले आहे.
कंपनी सुरू करण्यात काही अडचणी येत असल्याने दुसऱ्या टप्प्यातील कामगार भरती सध्या थांबविण्यात आल्याचे समजते. मिऱ्याबंदर येथील भारती शिपयार्ड कंपनी दिवाळखोरीत गेली आहे. त्यानंतर येथे नव्या उद्योगाला चालना देण्यासाठी व त्या कंपनीचे पुनर्जीवन करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या प्रयत्नांन यश आले असून भारती शिपयार्डच्या जागी आता ‘योमन मरीन’ या कंपनीचे कामकाज सुरू झाले आहे. कंपनीच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणानुसार प्रकल्प उभारणीची पूर्तता ग्रामपंचायतीबरोबर समन्वय साधून करण्याचा कंपनीचा मानस आहे.
भारतीय नौदल व तटरक्षक दलाच्या युद्धनौकांच्या बांधणीचे व दुरुस्तीचे कार्य करत आहे. मिऱ्या येथे सुमारे ४० वर्षापासून भारती शिपयार्ड ही कंपनी जहाज बांधणी व दुरुस्ती या उद्योगासाठी कार्यरत होती. परंतु हळुहळु ही कंपनी आर्थिक डबघाईला आली आणि कालांतराने बंद पडली.
दृष्टिक्षेपात -: 1) सडामिऱ्या ग्रामपंचायतीला दिले पत्र
2) दुसऱ्या टप्प्यातील कर्मचारी भरती थांबली
3) २४ लाख ७५ हजार थकीत घरपट्टी भरली
टप्प्याटप्प्याने सुरू होणार – उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे कंपनी टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. कंपनीची मालमत्ता सुरक्षित राहावी, यासाठी दगड कंपाउंड आणि गेट उभारण्यात आले होते. ते काहींनी बळजबरीने उघडल्याने कंपनीची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्याबाबत कंपनीने स्थानिक ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे. अशी बळजबरी राहिल्यास प्रकल्प उभारण्याबाबत विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा कंपनीने दिला आहे.