मुंबई-गोवा महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांच्या मालिका सुरुच आहेत. रोज दोन ते तीन तरी लहान मोठ्या वाहनांचे अपघात होत आहेत. आणि वाहनांच्या नुकसानासह जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील आठवड्यामध्ये देखील अवघड वळणावर झालेल्या अपघातामध्ये दोन्ही वाहने पुलावरून खाली कोसळली होती. त्यावेळी देखील मदत ग्रुपचे स्वयंसेवक वेळ काळ न पाहता मदतीसाठी हजर राहिले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात बुधवारी वेरळ गावातील खोपी फाट्यानजीक दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवर स्वार चौघेजण जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महामार्गावरून बुधवार ता. ८ रोजी रायगड येथून शिवफाटा येथे जाणारी दुचाकी एमएच-०६-बीएस-४२६५ दुपारी खोपी फाट्यानजीक भोस्ते घाट चढत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीवर धडकली.
या अपघातात दुचाकीस्वार शंकर विष्णू जाधव, रोहित वसंत जाधव, विनोद शंकर जोशी व अमित रामचंद्र जोशी हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांच्यासह स्वयंसेवक साई साळुंखे, बबलू भोसले, बुऱ्हान टाके, नादिर टाके आदींनी रुग्णवाहिकेतून जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांना देखील या मदत ग्रुपचे कायम सहकार्य लाभत असते.
अपघातात जखमी झालेल्या चौघांना देखील प्राथमिक उपचार करून, त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मदत ग्रुपचे कार्यकर्ते कायमच अपघातग्रस्तांच्या मदतीस पुढे सरसावलेले दिसतात. मागील आठवड्यामध्ये देखील झालेल्या महामार्गावरील अपघातामध्ये जखमी झालेल्याना तत्काळ मदत पोहचवून, त्यांच्या पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली होती.