बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोरोनापेक्षा जास्त भीती बायोबबलचीच घेतल्याने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतूनही अनेक परदेशी खेळाडूंनी माघार घेतली आहे, असा स्पष्ट दावा केला आहे. गेल्या वर्षी ही स्पर्धा कोरोनाच्या धोक्यामुळे अमिरातीत खेळवली गेलेली होती. मात्र, यंदा ही स्पर्धा भारतातच खेळवली जात आहे आणि भारतातील कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. परदेशी खेळाडू हे आपल्या असणार्या स्वातंत्र्याबाबत खूपच आग्रही असतात. त्यांची बायोबबलमध्ये जास्त दिवस राहण्याची तयारी नाही कारण तशी त्यांची मानसिकताही नसते. याउलट भारतीय खेळाडूची मानसिकता सर्व वातावरणामध्ये सामावून घेण्याची असल्याने बायोबबलच काय तर इतर कोणत्याही वातावरणात ते राहू शकतात. भारतीय खेळाडू मानसिकदृष्ट्या परदेशी खेळाडूंपेक्षा जास्त मजबूत आहेत, असे मत गांगुली यांनी मांडले. आयपीएलच्या 14 व्या मोसमाला येत्या शुक्रवारपासून म्हणजेच ९ एप्रिल पासून आरंभ होत आहे.
मागील वर्षीचा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि विराट कोहली नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळुरू या दोन संघामध्ये यंदा पहिला सामना रंगणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये होणाऱ्या हा सामना प्रेक्षकांविना खेळविला जाणार आहे, कोरोनाच्या वाढत चाललेल्या रुग्णसंख्येमुळे या पार्श्वभूमीवर, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. मात्र, असे असले तरी या दोन संघांमधील सामन्याबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मागील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेपासून भारतीय खेळाडू जवळपास सहा महिने बायोबबलमध्ये आहेत. त्या उलट परदेशी खेळाडूंना काही काळ तरी विश्रांती मिळाली आहे. तरी पण त्यांना बायोबबलमध्ये राहिल्यास आपले स्वातंत्र्य धोक्यात येइल अशा मानसिकतेमुळे, कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे नाही तर बायोबबलमध्ये राहण्याच्या दडपणामुळे काही परदेशी खेळाडू यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेत असल्याचे गांगुली यांनी म्ह्टले आहे.
दरम्यान, भारताचे खेळाडू स्पर्धेसाठी सातत्याने महिनोन्महिने बायोबबलमध्ये राहात आहेत. भविष्यात दौऱ्याचे नीयोजन करताना याचा नक्कीच विचार केला जावा, असे मत काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले होते. आणि कोहलीचा हा मुद्दा प्रत्येक स्पर्धेवेळी नक्कीच लक्षात ठेवला जाईल, असे आश्वासनही गांगुली यांनी दिले आहे. गेल्या वर्षी झालेली अमिरातीतील स्पर्धा असो किंवा यंदा भारतात होणारी स्पर्धा असो, परदेशातून स्पर्धेसाठी येणारे काही खेळाडूं याच कारणाने माघार घेत आहेत, या मुद्द्यावर गांगुली ठाम राहीले.