येथील तेरवण-मेढे जंगलात ‘वाईल्ड वन’ या नावाने प्राणी व पक्षी अभ्यासकांसाठी उभारलेल्या इमारतीच्या परिसरात ‘ब्लॅक पँथर’ दृष्टीस पडला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याबाबत वाईल्ड वन’च्या कर्मचाऱ्यांसाठी संपर्क साधला असता ही घटना खरी असल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्मिळ ब्लॅक पँथरचे अस्तित्व दोडामार्गातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांत आढळल्याने जैवविविधता विपुल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दोडामार्गमधील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तेरवण-मेढे येथील जंगलात दोन दिवसांपासून ‘ब्लॅक पँथर’चे दर्शन झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
त्यासंदर्भात वन विभागाशी संपर्क साधला; मात्र याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा उलगडा करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी ‘वाईल्ड वन’च्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी कर्मचाऱ्यांनी तो व्हिडीओ खरा असून, ब्लॅक पँथरचे येथे दर्शन झाल्याचे स्पष्ट सांगितले. ब्लॅक पँथर वाघ दिसणे म्हणजे तिलारी परिसर जैवविविधतेने परिपूर्ण असल्याचा अजून एक पुरावा पुढे आला आहे. अलीकडेच ‘वाईल्ड वन’च्या कामगारांना दोन वेळा पट्टेरी वाघाचे दर्शन झाले होते. त्यावरून या परिसरातील जैवविविधतेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.