यंदाच्या वर्षीचं पहिलं संपूर्ण चंद्रग्रहण आपल्याला मे महिन्यामध्ये पाहण्याची पर्वणी लाभणार आहे. या ग्रहणामध्ये संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या पाठीमागून तिची सावली बनून निघून जाणार असल्याची चर्चा आहे. २६ मे रोजी यंदाचं पहिलं चंद्रग्रहण होणार आहे. यापूर्वी देशामध्ये दिनांक २१ जानेवारी २०१९ रोजी देखील चंद्रग्रहण पाहायला मिळाले होते. २६ मे रोजी असणाऱ्या चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राचा रंग रक्तासारखा लाल दिसणार असल्याने शास्त्रज्ञानी त्याला ब्लड मून देखील म्हटलं जात असे स्पष्ट केले आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी केवळ चंद्रग्रहणच लागणार नसून, अवकाशामध्ये काही विशेष खगोलशास्त्रीय घटनांही घडून येणार आहेत.
जाणून घेऊया नक्की या चंद्रग्रहणाबद्दल थोडक्यात ! जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेमध्ये येतात, तेंव्हा पूर्ण चंद्रग्रहण होते, चंद्रग्रहणामध्ये चंद्राची विविध रंगी रूपे पाहता येतात, जेंव्हा चंद्रग्रहणाला सुरुवात होते, तेंव्हा प्रथम चंद्र काळ्या रंगामध्ये दृष्टीस पडतो, त्यानंतर हळूहळू चंद्राचा रंग बदलून तो संपूर्ण लाल रंगाचा दिसतो. ज्याला ब्लड मून असे संबोधलं जाते. ब्लड मूनचे दर्शन ही तेव्हाच होते, जेंव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीमध्ये झाकला जातो आणि आकाशामध्ये लाल रंगाच्या प्रकाशाच्या छटा दिसून येतात. जगभरातील अनेक भागांमधून ब्लड मूनचे दर्शन होणार आहे. भारतामध्ये हे चंद्र ग्रहण केवळ 5 मिनिटांसाठीच दिसणार असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.
नासाकडून प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या वर्षी संपूर्ण चंद्रग्रहणाचा कालावधी हा एकूण ३ तास ७ मिनिटांपर्यंत असणार आहे. ज्यामध्ये अंशिक ग्रहण आणि पूर्ण चंद्रग्रहण दोघांचाही समावेश असणार आहे. तसं पूर्ण चंद्रग्रहण हे फक्त १५ मिनिटांसाठी दिसणार असून, चंद्रग्रहणाच्या वेळेबाबत पाहिलं तर, ग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी २.१७ वाजता सुरु होउन, पूर्ण चंद्रग्रहणाचा लाभ आपल्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ४.४१ वाजता घेता येणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संपूर्ण चंद्रग्रहणाची सांगता ७.१९ वाजता होणार आहे.
ब्लड मून २०२१ प्रशांत महासागर, अटलांटिक, हिंद महासागर, दक्षिण आशिया, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिकेतील बहुतांश भागांत, दक्षिण अमेरिका आणि अंटार्कटिकामध्ये दिसून येणार आहे. मेलबर्न, सॅन फ्रांसिस्को, सियोल, शांघाई होनोलूलू, ह्यूस्टन, लॉस एंजिल्स, मनीला, टोकियो या शहरांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी फक्त अंशिक स्वरूपामध्ये चंद्रग्रहण दिसणार आहे, ज्यामध्ये ढाका, मॉन्ट्रियल, न्यूयॉर्क, टोरंटो, बँकॉक, शिकागो, आणि यांगून यांसारख्या शहरांचा समावेश आहे.