चिपळूण शहर उध्वस्त करणार्या निळ्या व लाल पूररेषे विरोधात नागरिकांच्या १२ हजार २६४ हरकती आतापर्यंत प्राप्त झाल्या असून या पूररेषेला नगरपरिषदेचाही विरोध आहे, अशा आशयाचा ठराव यापूर्वीच दि. ३० सप्टेंबरच्या कौन्सिलमध्ये सर्वानुमते झाला आहे. आता पाटबंधारे खात्याचे पत्र आले असून त्यांना पालिका व नागरिकांचा विरोध कळविण्यात यावा, तसेच नागरिकांच्या हरकती व सूचना याबाबतही कळवावे, म्हणजे कोणती उपाययोजना करावी, तेही ठरविण्यात मदत होईल.
नदीसंवर्धन योजनेतून वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याबरोबरच बंधारे बांधता येतील, असे पालिकेच्या सभेत ठरले. शहरातील शिवनदीचा गाळ काढण्याचे काम गुरूवारपासून सुरू होणार आहे. यासाठी सध्या ९ लाखांचा निधी मंजूर असून संपूर्ण नदीतील गाळ काढण्यासाठी एक कोटींची तरतूद करण्याचा निर्णय पालिकेच्या बुधवारच्या सभेत घेण्यात आला.
२२ जुलेच्या महापूरानंतर सावरत चिपळूणकर आता कुठे तरी उभे राहत असताना पाटबंधारे विभाग यांनी लाल व निळ्या पुररेषा मारल्यामुळे त्या जाचक रेषा असून यातून चिपळूण पूर्णपणे नेस्तनाबूत होणार आहे. त्यामुळे चिपळूणवासियाच्या अडचणीमध्ये अजून वाढ झाली आहे. या रेषा रद्द करून पुन्हा विचार करण्यासाठी चिपळूण येथील हजारो नागरिकांनी हरकती नगरपालिकेमध्ये दिल्या आहेत. याबाबत काही मुस्लिम समाजातील सामाजिक संस्था व बांधव हे देखील पेटून उठले असून, लाल व निळ्या पुररेषामुळे चिपळूणचे अतोनात नुकसान होणार आहे आणि चिपळूणवासिय हे कदापि सहन करणार नाहीत, याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम. उदय सामंत व आम. शेखर निकम यांच्याकडून चिपळूणवासिय खूप अपेक्षा ठेवून आहोत. आणि जर एवढ्या विरोधानंतर सुद्धा हीच पूररेषा कायम करण्यात आली, तर मात्र लोक तीव्र आंदोलन करतील असा इशाराच उद्योजक नासिर खोत यांनी दिला आहे.
या पूररेषेबद्दल आम. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले कि, नदीचा गाळ संपूर्ण उपसाल्याशिवाय पूररेषा निश्चित करणे अयोग्यच आहे. आणि आता निश्चित केलेली पूररेषा कायम ठेवल्यास चिपळूण शहरातील ७० टक्के परिसर बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिपळूण आणि स्थानिकांच्या हिताचाच विचार करून पूररेषा निश्चित करण्यात येईल.