रत्नागिरी जिल्ह्यातील एका बड्या बँकेच्या ९३ कर्जदार आणि जामीनदारांना सहाय्यक निबंधक रत्नागिरी यांनी कर्जवसुलीबाबत नोटीस बजावली आहे. १० सप्टेंबर रोजी त्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले आहे. दरम्यान यातील काही जणांनी आपण बँकेकडून कोणतेही कर्ज घेतलेले नाही, तसेच आपण कोणाला जामीनही राहिलेलो नाही, असे सांगितल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे १० सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीत नेमके काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर बोगस कर्जप्रकरणे झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याविषयी रत्नागिरी तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक रावसाहेब पाटील यांच्याकडे पत्रकारांनी संपर्क साधून माहिती घेतली असता संबंधित बँकेने थकित कर्जदार आणि जामीनदार अशी एकूण ९३ जणांची यादी आपल्याकडे पाठविली. त्याअनुषंगाने आमच्या कार्यालयाकडून संबंधितांना या १५ दिवसांत थकित रक्कम वसुलीबाबत नोटीसा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान ज्यांना नोटीसा पाठविल्या त्यातील काही जणांना या कार्यालयात स्वतः येऊन आम्ही कोणतेही कर्ज घेतलेले नाही किंवा कुणाला जामीनही राहिलेलो नाही, असे सांगितल्याची माहिती सहाय्यक निबंधक रावसाहेब पाटील यांनी पत्रकारांना दिली. त्यानंतर संबंधित बँकेचे अधिकारी आणि कर्जदार या दोघांनाही त्याबाबतचे पुरावे घेऊने येण्याबाबत, कागदपत्रे सादर करण्याबाबत सांगितले असून १० सप्टेंबरला सुनावणी निश्चित केली आहे, असे देखील सहाय्यक सहकार निबंधक रावसाहेब पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. यामुळे खळबळ उडाली असून बोगस कर्ज प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे १० सप्टेंबरच्या सुनावणीत नेमके काय होते, याकडे लक्ष लागले आहे.