मुंबई-गोवा महामार्गावरील खेडमधील जगबुडी नदीच्या नवीन पुलावरील एक्सपान्शन जॉईंटचे काँक्रीट निघाल्याने दोन दिवसापूर्वी भगदाड पडले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने या पुलावरील वाहतूक बंद केली. दुसऱ्या पुलावरून दोन्ही बाजूकडील वाहतूक रविवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरु केली आहे. या भगदाड पडलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु झाले असून रॅपिड हार्डिंग सि वापरून तो भाग नव्याने जोडण्यात आहे. या सर्व प्रक्रियेला पुढील १० ते १५ दिवस लागण्याची शक्यता लागणार असून पावसाचा जोर कायम राहिल्यास अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली सुरु आहे. भरणेनाका येथील जगबुडी नदीवरील नव्याने बांधलेल्या पुलाच्या एक्सपान्शन जॉईंटचे सिमेंट निघून भगदाड पडले आणि रविवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. चिपळूणचा पूल कोसळला. नव्याने सुरु झालेल्या महामार्गावरील कशेडी बोगद्याला पहिल्याच पावसात गळती लागली, त्यानंतर यावर्षी जगबुडी नदीवरील नव्या पुलाची झालेली ही अवस्था महामार्गाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. रविवारी मुसळधार पावसात जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असताना जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड पडले.
हा पूल अवघ्या दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२१ ला पूर्ण झाला आणि त्याच्यावरून वाहतूक सुरु करण्यात आली. या पुलाची लांबी १२९ मीटर एवढी आहे, तर रुंदी १६ मीटर आहे. सन २०१४ साली या पुलाच्या कामाचे पहिले टेंडर काढण्यात आले. नागपूर येथील खरे तारपुंडे या कंपनीला या पुलाचा ठेका देण्यात आला. त्यानंतर काही करणास्तव या कंपनीला टर्मिनेट करण्यात आले आणि या पुलाचा नवा ठेका २०१८-१९मध्ये महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमि टेड या कंपनीला देण्यात आले. दोन वर्षात या पुलाचे काम पूर्ण करीत २०२१ साली हा पूल वाहतुकीसाठी खुला केला गेला. या सर्व कामाला अंदाजे ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र दोन वर्षातच या पुलाची झालेली ही अवस्था या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.