सामंत म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांच्यामुळे कोकणातच पत्रकारिता जन्माला आली. त्याचा वारसा पुढे चालत असताना पत्रकारांची कार्यशाळा या भूमीतच होते, याचा सार्थ अभिमान आहे. पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी सरकार म्हणून आम्ही सकारात्मक आहोत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीशी भक्कम राजाश्रय उभा करणे हे आमचे काम आहे. याप्रसंगी माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह म्हणाले, ‘एआय’चा समाजमाध्यमांवर मोठा प्रभाव पडला आहे. भविष्यात हे आपण रोखू शकत नाही; परंतु त्याचा योग्य आणि चांगला वापर करणे हे आपल्या हातात आहे. माणसाची हुबेहूब नक्कल करणारे जेनेटिक म्हणजे ‘एआय’ आहे.
सर्वांच्याच नजरा एआय या कृत्रिम बुद्धिमतेच्या तंत्रज्ञानाकडे लागले आहे. तंत्रज्ञानातील ही एक विलक्षण क्रांती आहे. सर्वच क्षेत्रामध्ये एआयचा कमी-जास्त प्रमाणात वापर होताना दिसत आहे. मानवी जीवन सोपे आणि अधिक कार्यक्षम बनवणे हे या तंत्रज्ञानाचा उपयोग आहे. समाजमाध्यमांमध्ये देखील त्याचा वापर वाढला आहे. यामुळे प्रिंट मीडियाला धोका आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, काळाप्रमाणे नवे बदल आपण आत्मसात केले तर आपण या स्पर्धेच्या युगामध्ये टिकणार आहोत असेही सिंह यांनी सांगितले. या वेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक हेमराज बागुल, उपसंचालक अर्जना शंभरकर, विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह कोकणातील पत्रकार एकत्र आले होते.