मुंबई-गोवा महामार्गाचे काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण करत नसेल तर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करा, अधिकाऱ्यांनी आता याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे. चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अशा कडक शब्दात रत्नागिरी-सिंधदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी ठेकेदारांना सुनावले. खासदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. राणे म्हणाले, पहिल्या पावसातच लांजा येथील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा बोजवारा उडाला. नागरिक आणि वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. योग्य काम करत नसेल तर त्याचा ठेका रद्द करा. काम योग्य होण्यासाठी अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष जागेवर जाऊन ठेकेदार काय काम करतोय, किती माणसं आहेत, योग्य पद्धतीने काम होते की, नाही याची खात्री करा आणि त्याचा अहवाल द्या. पावसाळा येत्या ७ जूनपासून सुरू होतो. तोपर्यंत उर्वरित कामे पूर्ण झाली पाहिजे यासाठी नियोजन करा.
सध्या ग्रामीण रस्त्यांची काय स्थिती आहे, त्यातील किती रस्ते खराब आहेत याचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषदेला केल्या. यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील ३७ गावांतील ९० वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे; मात्र आता रत्नागिरी जिल्हा पूर्ण टँकरमुक्त होण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी पुढच्या वर्षीचे नियोजन आत्तापासूनच करा. गाव आणि वाडीवर असलेले पाणीस्त्रोत शोधून तेथून जनतेला कशा पद्धतीने मुबलक पाणीपुरवठा करता येईल आणि पाणीटंचाई कायमची कशी संपुष्टात येईल यासाठी प्रयत्न करा, असे खासदार राणे यांनी सांगितले. शाळा सुरू होण्यापूर्वी त्या सर्व शाळांची दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्याबाबत आदेश देतानाच शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण करून योग्य ती खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व आरोग्यकेंद्रांमध्ये औषधांचा योग्य पुरवठा करताना डॉक्टरांच्या नियुक्त्या करून साथीचे आजार पसरणार नाहीत, याबाबत खबरदारी घ्यावी, अशा सूचना दिल्या.
हापूसची बर्फी प्रसिद्ध होऊ शकते – नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत तशीच तिथली बर्फीसुद्धा खूप लोकप्रिय आहे. त्याच धर्तीवर येथील रत्नागिरी हापूस आंबा उत्पादन वाढवताना त्याच पद्धतीने रत्नागिरी हापूस आंबाबर्फी प्रसिद्ध होऊ शकते. यासाठी काय करता येईल, याचेही नियोजन करा, अशा सूचना खासदार राणे यांनी दिल्या.