रत्नागिरी शहरात धाड ब्राऊन हेरॉईन, गांजा जप्तः दोघांना अटक

298
Brown heroin, ganja seized, two arrested

रत्नागिरी पोलीसांच्या विशेष पथकाद्वारे अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघा संशयितांना धाड टाकून पकडण्यात आले आहे. चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ब्राऊन हेरॉईन तसेच गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारच्या मध्यरात्री हे थरारनाट्य घडले. रत्नागिरी जिल्ह्यात, मागील काही दिवसात, काही ठिकाणी अमली पदार्थाची खरेदी व विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड व पोलीस निरीक्षक, हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉ. समाधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पोलीस पथक गठित करण्यात आले. दि. १२ ते १३ मे दरम्याने, या विशेष पोलीस पथकाद्वारे रत्नागिरी शहारामधील विविध ठिकाणी गस्त घालण्यात येत होती. या पथकामधील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शांताराम झोरे यांना धनजीनाका आंबेडकर रोड येथील रशिद हकीम यांचा मुलगा मुबीन हकीम हा त्याचे राहते घरी अंमली पदार्थ विक्री करिता ठेवत असले बाबत गोपनीय बातमी प्राप्त झाली. मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने पंचासमक्ष झडती घेतली असता, घराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या रूममध्ये आवाज आल्याने रुमचा दरवाजा उघडून पाहता, त्याठिकाणी दोन इसम रात्री २३.५५ वाजता संशयितरित्या बसलेले दिसले. तसेच रुममध्ये फॉईल पेपरचे तुकडे, सिगारेटचे अर्धवट जळालेले तुकडे दिसून आले.

संशयावरून त्या ठिकाणी उपस्थित दोन्ही इसमांची चौकशी करण्यात आली व या चौकशी दरम्याने त्यांनी आपली नावे, मुबिन रशिद हकीम, वय २२ वर्षे, रा. धनजीनाका, आंबेडकरवाडी, जाणाऱ्या रोडवर, ता. जि. रत्नागिरी व मस्तान मकदुम शेख व २४ वर्षे, रा. मच्छिमार्केट, बाजारपेठ, ता. जि रत्नागिरी अशी सांगितली. या पथकामार्फत लागलीच त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली. या कारवाई मध्ये आरोपी मुबिन रशिद हकीम याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात एका प्लास्टीकच्या पिशवीमध्ये कागदाच्या एकूण ११५ लहान लहान पुड्यांमध्ये टर्की पावडर व डाव्या खिशात स्मोकींग ब्राऊन पेपर मिळून आले तसेच आरोपी मस्तान मकदुम शेख याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या डाव्या खिशात एका पारदर्शक प्लास्टीकच्या पिशवीमध्ये गांजा मिळून आला. दोन्ही आरोपींच्या अंगझडती मध्ये मिळून आलेले अंमली सदृश्य पदार्थांची अंमली पदार्थ तपासणी किट व्दारे तपासणी केली असता ते ब्राऊन हेरॉईन व गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे पंचांसमक्ष वजन करण्यात आले ज्यामध्ये ब्राऊन हेरॉईन २.९४ ग्रॅम व व गांजा १६.५८ ग्रॅम आहे तसेच दोन्ही आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर केले असता दिनांक १५ मे रोजी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब), २२ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. या कारवाईत डॉ. समाधान पाटील, (परि. पोलीस उपअधीक्षक), सपोनि संजय पाटील, अमर पाटील, उप निरिक्षक शितल पाटील, सपोफौ विलास दिडपसे, पोहवा शांताराम झोरे, नितीन डोमणे, अरूण चाळके, बाळू पालकर, सागर साळवी, प्रविण खांबे, सत्यजित दरेकर, योगेश नार्वे कर, विद्या लांबोरे, महीला कक्ष, छाया चौधरी, सांची सावंत, शिपाई विवेक रसाळ, अक्षय कांबळे, फॉरेन्सिक युनिट आदींनी या पथकाचा सहभाग होता.