गेले १८ दिवस बारसू सड्यावर रिफयनरी माती सर्वेक्षणाची मोहीम प्रशासनाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात फत्ते केली आहे. रिफायनरी माती सर्वेक्षणाला शेतकरी आंदोलकांनी केलेल्या विरोधाची दखल प्रमुख राजकीय पक्षांबरोबर अनेक सामाजिक संघटनांनी घेतल्याने आगामी काळात कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तवली जात आहे. बारसू सोलगाव प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प माती सर्वेक्षण तालुका प्रशासनाने दि. २२ एप्रिल पासून बारसू परिसरात जमाव बंदी लागू करुन बारसू -सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी ‘संघटनेच्या पदाधिकारी यांना तालुका, जिल्हा बंदी नोटीस बजावून कामाला सुरुवात केली होती. प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता शेतकऱ्यांनी रिफायनरी प्रकल्प माती सर्वेक्षणाला विरोध केला. प्रचंड पोलीस बंदोबस्तात शेतकऱ्यांचा विरोध मोडीत काढून प्रशासनाने बारसू सड्यावर माती सर्वेक्षणासाठी बोअरवेल मारल्या. त्यानंतर प्रशासनाने बारसू सड्यावरील पोलीस बंदोबस्त हटवला आहे.
शेतकऱ्यांची एकाकी लढत
बारसू रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेऊन प्रशासनाने गेले काही दिवस स्थानिक जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कोकणात प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प नको या एकाच मागणीवर शेतकरी ठाम राहिले. प्रशासनाने रिफायनरी प्रकल्प माती सर्वेक्षण काम सुरू ठेऊन स्थानिक जनते बरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत चर्चा करणार नाही असे धोरण अवलंबिले. आंदोलनाची राज्यात दखल बारसू सड्यावर पोलिसांचा ताफा अडवण्यासाठी आंदोलक महिला यांनी रस्त्यावर झोपून दिले. त्यानंतर झालेला उद्रेक थांबवण्यासाठी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि अश्रूधूर नळकांड्या फोडल्या यांच्या बातम्या प्रसिद्ध होताच त्याचे पडसाद राज्यभर उमटले. मुंबईत विविध सामाजिक संघटनांनी निदर्शने करून शासनाचा निषेध केला तर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आंदोलकांना पाठिंबा देत शेतकऱ्यांसह बारसूत जाण्याचे घोषीत केले.
राजकीय पक्षांचे लक्ष स्थानिक जनतेचा विरोध लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शासनाला प्रकल्प करताना स्थानिक जनतेला विश्वासात घेण्याचा सल्ला दिला. तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि कॉंग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी बारसू येथे आंदोलकांची भेट घेऊन आंदोलकांना पाठिंबा दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील सभेत कोकणात प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प नको अशी भूमिका घेतली. बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही रिफायनरीला विरोध केला. तर बळी राज सेना अध्यक्ष अशोक वालम यांनी कोकणात रिफायनरी विरोधी आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला. राजकीय समीकरणे बदलणार कोकणातील बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाने रिफायनरी प्रकल्प विरोधी भूमिका घेतली आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बळी राज सेना, बहुजन वंचित आघाडी आणि कॉंग्रेस या पक्ष्यांनी रिफायनरी प्रकल्प विरोधी भूमिका घेतली आहे तर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने रिफायनरी प्रकल्प समर्थन केले आहे. त्यामुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.