खासगी मोबाईल कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी भारत दूरसंचार निगम लि. (बीएसएनएल) कंपनी ४ जी सेवा घेऊन रिंगणात उतरली आहे. राज्यात सर्वांत जास्त बीएसएनएलचे ग्राहक असलेले जिल्हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे आहेत; परंतु गेल्या काही वर्षांपासून कोलमडलेल्या बीएसएनएलच्या सेवेमुळे थोडेथोडके नव्हे तर १ लाख ग्राहक बीएसएनएलपासून तुटले आहेत. ते सर्व खासगी कंपन्यांकडे वळले. कंपनीला नवसंजीवनी देण्यास केंद्रशासनाच्या झालेल्या दिरंगाईचा हा मोठा फटका बसला आहे. केंद्र शासनाला उपरती सुचली आणि रजी सेवेमध्ये असलेल्या बीएसएनएलला नवसंजीवनी देण्यासाठी ४जी सेवा सुरू केली. त्यामुळे बीएसएनएल कंपनीला पुन्हा चांगले दिवस येणार, हे निश्चित आहे. जिल्ह्यात बीएसएनएलचे १८८ नवीन टॉवर उभारले जात आहेत. त्यापैकी १०६ उभारण्यात आले आहेत. उर्वरित लवकरच उभारले जाणार आहेत; परंतु अजूनही बीएसएनएल कंपनीपुढे अनेक अडचणी आहेत. शिवसेना माजी खासदार विनायक राऊत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये बीएसएनएलच्या काही टॉवरचे वीज बिल भरलेले नाही.
काहींना बॅकअपसाठी बॅटरी नाही, सोलर पॅनल नाही, फायबर केबल नाही, काहींचे काम झाले आहे; परंतु वरिष्ठ विभागाकडून टॉवर सुरू करण्याची परवानगी नाही, अशा अनेक अडचणींमुळे सेवेवर मोठा परिणाम होत आहे. अजून बीएसएनएल कंपनी सर्वसामान्यांची आहे. त्यामुळे राज्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कंपनीचे सर्वांत जास्त ग्राहक आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे तीन लाखांवर ग्राहक आहेत; परंतु मधल्या काळात कंपनीची सेवा कोलमडली. खासगी कंपन्यांनी मोफत सेवा सुरू केली आणि बीएसएनएलचे सुमारे १ लाख ग्राहक तुटले. स्थानिक मुख्य प्रबंधकांनी याला दुजोरा दिला. कंपनीला याची मोठी किंमत मोजावी लागली; परंतु आत ४जी सेवा सुरू केल्यामुळे अनेक ग्राहक पुन्हा बीएसएनएलकडे वळत आहेत; परंतु चांगल्या सेवेसाठी कंपनीकडे मनुष्यबळाची मोठी वानवा असल्याने त्याचा परिणाम सेवेवर होत आहे.
५५० ‘लॅण्डलाई’न होणार कायमचे बंद – जिल्ह्यातील बीएसएनएलची लॅण्डलाईन सेवा आता कायमची बंद करण्याचे आदेश आले आहेत. अजूनही ग्रामीण भागात हे लॅण्डलाईन फोन आहेत. काही कार्यालयीन कामकाजासाठी वापरले जात आहेत, तर काही ठिकाणी मोबाईल टॉवरची रेंज नाही, अशा ठिकाणी वापरले जात आहेत. जिल्ह्यात सध्या ५५० लॅण्डलाईन फोन आहेत. ही सेवा येत्या काळात बंद करण्यात येणार आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.