बैलगाडी स्पर्धांना परवानगी देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता गावागावांत बैलगाडी शर्यतीची चुरस पाहायला मिळणार आहे. कोकणात गेल्या काही दिवसांमध्ये बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले जात आहे. बैलगाडी शर्यतीची परवानगी सात दिवसांत देणे बंधनकारक आहे. आयोजकांना कागदपत्रे सादर करण्यास व परवानगी मिळवण्यासाठी विलंब होत होता. हे काम सुलभ व नियमांचे पालन करून व्हावे याकरिता आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना बैलगाडी स्पर्धांच्या परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वी ते जिल्हाधिकाऱ्यांकडे होते. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त यांच्याकडील परिपत्रकानुसार राज्यातील बैलगाडी शर्यती आयोजित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आली आहे.
त्यामधील नियम व अटीशर्थीचे काटेकोरपणे पालन करून बैलगाडी शर्यतीला परवानगी दिली जात आहे. महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरेनुसार साजऱ्या करण्यात येणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव अशा प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यात बैलगाडी शर्यतींना परवानगीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येतात. चिपळूण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बैलगाडी शर्यती होतात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांत शर्यतीसाठी परवानगी दिली जाते; परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्जदारास आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव विहित मुदतीत सादर करणे, कागदपत्रांची, त्रुटींची पूर्तता करणे तसेच संबंधित विभागांचे अहवाल, अभिप्राय प्राप्त होणे यासाठी बराच अवधी लागतो. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्याचे सर्व अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.