रेल्वे स्थानकातील रिक्षा व्यावसायिकांची दादागिरी वाढली आहे. तेथील एका टोळक्याने शेअरिंग भाड्यासाठी थांबवलेल्या रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांमध्ये वाद उफाळला असून पोलिस किंवा आरटीओ विभागाने ही मुजोरी मोडीत काढण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. रेल्वेस्थानकातील रिक्षा व्यावसायिकांबाबत वारेमाप आकारल्या जाणाऱ्या भाड्यावरून प्रवासीवर्गांच्या तक्रारी आहेत. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाचजणांविरुद्ध तक्रार नोंदवली असून, जखमी रिक्षा व्यावसायिक प्रणव प्रदीप साळुंखे हे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.
राजेश पाडावे, सचिन खेत्री, रूपेश चव्हाण, बापल वाडकर, हरीशभैया या रिक्षाचालकांनी मिळून आपल्याला मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहेत. रेल्वेस्टेशन येथे दादागिरी करणाऱ्या संस्थानिक रिक्षा चालकांच्या त्रासाला प्रवासी, नागरिक हैराण झाले आहेत. रिक्षाचालक प्रणव साळुंखे यांनी आपली रिक्षा हॉटेल गिरीराज येथे शेअरिंग भाड्यासाठी पार्क केली होती. स्थानक परिसरात दादागिरी करणारे पाच ते सहा रिक्षाचालक तिथे येऊन तुला इथे रिक्षा थांबवू नको तरी सांगून समजत नाही का, असे बोलत रिक्षाचालक साळुंखे यांना जबर मारहाण केली.
रेल्वे स्थानकातील रिक्षा व्यावसायिकांबाबत अनेक तक्रार आहेत. प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जात आहे. याबाबत आरटीओ (प्रादेशिक परिवह विभाग) आणि पोलिसांनी सूचना देऊनही त्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. ही दादागिरी पर्यटक, प्रवाशांची लूट करणारी ठरत असेल तर पोलिसांनी यावर योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी होत आहे.