जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी महिला प्रभाग संघांना ५ हाउस बोट आणि ३ टुरिस्ट बसेस खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजनेतून ६ कोटी २८ लाख २४ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ३ हाऊस बोट जयगडमध्ये ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान, जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या प्रयत्नाला यश आले आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करून या जिल्ह्यांचा सर्वकष विकास करण्याच्या दृष्टीने सिंधुरत्न समृद्ध ही पथदर्शी योजना दोन्ही जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यांमध्ये केरळच्या धर्तीवर हाऊसबोटमध्ये राहण्याचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला चालना, महिला सक्षमीकरणासाठी जिल्ह्यात हाऊस बोट आणि टुरिस्ट बस योजना राबविण्याची संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी मांडली होती. ही योजना आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. जिल्ह्यातील महिला प्रभाग संघांना शाश्वत उपजीविका निर्माण करून पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी टुरिस्ट हर्णे (ता. दापोली), कसबा (ता. संगमेश्वर) आणि रत्नागिरी तालुक्यातील वाटद, कोतवडे येथील प्रभाग संघांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
त्यासाठी १ कोटी २८ लाख २४ हजार रुपये मंजूर केले असून त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. वाटद (ता. रत्नागिरी) येथील जीवनज्योती महिला प्रभागसंघ, कोतवडे येथील एकता महिला प्रभागसंघ, बुरोंडी (ता. दापोली) येथील पालवी महिला प्रभागसंघ, मालदोली (ता. चिपळूण) येथील अग्निपंख महिला प्रभागसंघ, अंजनवेल (ता. अंजनवेल) येथील आनंदी महिला प्रभागसंघांना प्रत्येकी १ कोटी रुपये खर्च करुन हाऊस बोट देण्यात येणार आहेत.