पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या चिपळूणने लोकसभा निवडणुकीतही चमक दाखवली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील उबाठाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झाला असला तरी चिपळूणने त्यांना शेवटपर्यंत साथ दिली. दोन-चार फेऱ्या वगळता राऊत यांनी प्रत्येक फेरीत राणेंच्या विरोधात आघाडी घेतली. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राऊत यांनी तब्बल १८ हजार ९६१ चे मताधिक्य घेतले. त्यामुळे या निवडणुकीत राऊत यांचा पराभव झाला असला तरी उबाठाने चिपळूण विधानसभा मतदारसंघात बाजी मारल्याचे समाधान मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवार म्हणून नारायण राणे हे भाजपच्या कमळ चिन्हावर रिंगणात उतरल्यानंतर राऊत व त्यांच्यात थेट लढत होणार असल्याचे निश्चित झाले होते.
त्याप्रमाणे मतमोजणीत दोन्ही उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर झाली; परंतु चिपळूण विधानसभा मतदारसंघात राऊत यांच्या बाजूने एकतर्फी लढत दिसून आली. मतमोजणीच्या एकूण २४ फेऱ्यांपैकी तिसऱ्या, तसेच १४ ते १६व्या फेरींत राणेंनी मताधिक्य घेतले; मात्र, त्या व्यतिरिक्त सुरवातीपासून शेवटपर्यंत विनायक राऊत यांनी प्रत्येक फेरीत बाजी मारली. त्यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात राऊत यांना ७९ हजार ९५३ इतके मतदान झाले. राणेंना ५९ हजार ९९२ मतांवर समाधान मानावे लागले. त्याप्रमाणे राऊत यांना १८ हजार ९६१चे मताधिक्य एकट्या चिपळूण मतदारसंघातून मिळाले; मात्र त्यानंतरही त्यांचा पराभव झाल्याने उबाठामध्ये नैराश्य असले तरी चिपळूणमधून मताधिक्य घेतल्याचे समाधानही व्यक्त होत आहे.
चिपळूण मतदारसंघात राणे यांनी आमदार शेखर निकम व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या मदतीने भाजपने घराघरात प्रचार केला. त्याचा मोठा फायदा राणेंना झाला. गत लोकसभा निवडणुकीत राऊत यांना तब्बल ५५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे या निवडणुकीतही त्यांच्या बाजूने कौल जाईल, असा अंदाज होता; परंतु या निवडणुकीत चिपळूणमधून आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण हे राणेंच्या बाजूने ठाम उभे होते. त्याचा परिणाम म्हणून राऊत यांना गतवेळसारखे मोठे मताधिक्य मिळवता आले नाही.