बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदूवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी रत्नागिरीतील जागृत हिंदू समाजातर्फे हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. २९) सकाळी मारुती मंदिर ते जयस्तंभ या मार्गावर मोर्चा काढला जाणार असून, प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. या दिवशी दुपारपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून रत्नागिरी बंदची हाक दिलेली आहे. शहरातील व्यापारी, दुकानदार, विविध संघटनांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. भारतात १९४० मध्ये खलिफाला समर्थन देण्यासाठी भारतात खिलाफत चळवळ सुरू होती. आता बांगलादेशमधील हिंदूंवर अन्याय होत असल्याने भारतातही विविध ठिकाणी हिंदूंच्या समर्थनार्थ चळवळ उभी राहत आहे
या अनुषंगाने विविध ठिकाणी मोर्चा काढण्यात येत आहे व बांगलादेशातील हिंदूना पाठिंबा दर्शवला जात आहे. बांगलादेशवरील युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार १९७१ ला २० लाख हिंदूंना मारले गेले. १९९२ ला २८ हजार हिंदूंची घरे जाळण्यात आली, शेकडो स्त्रियांवरती अत्याचार करण्यात आले. १९७८, १९८९ ला व आता २०२४ ला सनातनी हिंदूवरती अत्याचार करण्यात येत आहेत. दरवर्षी अंदाजे २ लाख ३० हजार ६१२ हिंदू बांगलादेशमधून गायब होत आहेत. २ ते ५ ऑगस्ट या ४ दिवसांमध्ये २०५ ठिकाणी हल्ले झाले. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून २९ ऑगस्टला हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा मारुती मंदिर, माळनाका, जिल्हा शासकीय रुग्णालयामार्गे जयस्तंभापर्यंत काढण्यात येणार आहे.