25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriभरणेत ४ लाखांचा २२ किलो गांजा जप्त

भरणेत ४ लाखांचा २२ किलो गांजा जप्त

वाहन व सामानाची झडती घेतली असता बॅगमध्ये अमली पदार्थ सापडला.

खेड तालुक्यातील भरणे नाका येथे पेट्रोलिंग करताना एका गाडीमध्ये सापडलेला २२.०५९ किलोचा सुमारे ४ लाख ४१ हजारांचा गांजा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी (ता. २६) रात्री पावणेअकराच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर ही कारवाई केली. उदयसिंह मदनसिंह चुंडावत (वय ३७ वर्षे, रा. पाटरोड, मंडणगड), विशाल विद्याधर कोकाटे (३४, रा. पोस्ट ऑफिस बिल्डिंग, मंडणगड), सिद्धेश उदय गुजर (३२, रा. पाटरोड, मंडणगड) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर अमली पदार्थ व अन्य गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी महामार्गावर पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस पथक चिपळूण व खेड उपविभागात पेट्रोलिंग करत होते. त्याचवेळी भरणेनाका (ता. खेड) येथे रस्त्याच्या डाव्या बाजूस रस्त्यालगत एक चारचाकी गाडी उभी असल्याचे दिसले. पोलिसांनी वाहनाजवळ जाऊन हटकले. वाहनात चालकासह अन्य दोन व्यक्ती होत्या. त्या दोघांच्या मांडीवर बॅगा होत्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली.

सुरुवातीला संशयितांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसांनी त्यांच्या वाहन व सामानाची झडती घेतली असता बॅगमध्ये अमली पदार्थ सापडला. ४ लाख ४१ हजार १८० रुपये किमतीचा २२.०५९ कि. ग्रॅम वजनाचा गांजा, दोन सॅक बॅग व ६ लाख किमतीची चारचाकी गाडी असा एकूण १० लाख ४१ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास खेड पोलिस करीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षक रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular