26.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRatnagiriउमेदवारांच्या कुटुंबीयांकडून प्रचाराचा धडाका…

उमेदवारांच्या कुटुंबीयांकडून प्रचाराचा धडाका…

प्रचारातील सहभागामुळे निवडणुकीत वेगळाच रंग भरला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांचे कुटुंबीयही प्रचारात हजेरी लावून मतदार बांधवांना आवाहन करत आहेत. त्यात कुणाची पत्नी आहे तर कुणाचे वडील, भाऊ, मुले, बहीण यांचा समावेश आहे. विद्यमान आमदारांचे नव्हे तर विरोधातील उमेदवारांच्या सहचारिणीही प्रचारात सहभागी होताना दिसत आहेत. महिलांच्या रॅली, मेळावे, हळदी-कुंकू आदींच्या माध्यमातून सौभाग्यवती पतीचा प्रचार करताना दिसतात. कुणाची मुलगी तर कोणाचा मुलगा मतदारांशी संवाद साधत आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांची मुलगी अपूर्वा मागील काही महिन्यांपासून येथे सक्रिय आहे. तिने वडिलांच्या प्रचारासाठी ती मतदारांच्या स्वतंत्र गाठीभेटी घेत आहे. किरण सामंत यांचे बंधू रत्नागिरीचे आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत हेही राजापूरमध्ये मेळावे घेऊन मदत करताना दिसत आहेत. सत्तेच्या माध्यमातून सामंत यांनी मतदारसंघात केलेली कामे आणि नागरिकांच्या सोडवलेल्या अडचणी याचा फायदा नक्कीच त्यांना होणार आहे, तर महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी ठाकरे सेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी, मुलगा अथर्व आणि शुभम तसेच भाऊ संजय प्रचारात उतरले आहेत.

सामान्य लोकांच्या अडीअडचणी सुधारण्यासाठी रात्री-अपरात्री उपयोगी येणारा माणूस, पक्षनिष्ठा या विषयावर साळवी यांचे कुटुंब उतरलेले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांच्या प्रचाराची आतापर्यंत धुरा त्यांचे भाऊ किरण सामंत यांनी सांभाळली आहे. ते सध्या राजापुरात महायुतीचे उमेदवार आहेत, तरीही ते रत्नागिरी मतदारसंघावर लक्ष ठेवून भावाचा प्रचार करत आहेत. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी ते फोनवर संपर्क साधत आहेत. त्यांचे वडील रवींद्र सामंत आणि आई हे मतदारसंघातील लोकांशी संपर्क साधत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाळ माने यांचा मुलगा मिहीर आणि विराजही हिरीरिने सहभाग घेत आहेत. कार्यालयीनच नव्हे तर प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत, तसेच मानेंच्या पत्नी माधवी मानेही प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. भाऊ हेमंत माने कृषी व सहकार क्षेत्रात कार्यरत सक्रिय झाले आहेत.

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी त्यांची पत्नी स्वप्ना यांनी पदर खोचला आहे. वाशिष्ठी दूध डेअरी आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांचा थेट मतदारांपर्यंत संपर्क आहे. त्यांच्या प्रचारातील सहभागामुळे निवडणुकीत वेगळाच रंग भरला आहे. मुलगी स्वामिनी, सासरे सुभाषराव चव्हाण, सासू स्मिता चव्हाण आणि मेहणे वैभव चव्हाण निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार शिखर निकम यांच्या पत्नी पूजा निकम प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. त्या चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती होत्या. बचतगटाची चळवळ त्यांनी उभी केली आहे. त्यामुळे गावोगावी होणाऱ्या प्रचार रॅली, कोपरा सभा आणि बैठकांमध्ये उपस्थित राहून त्या मतदारांशी संवाद साधत आहेत. मुलगा अनिरुद्ध निकम प्रचारात सक्रिय आहेत. त्यांनी थेट कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गाठीभेटींवर भर दिला आहे. गुहागर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी त्यांची पत्नी सुवर्णा जाधव, मुलगा विक्रांत, समीर आणि भाऊ सुनील जाधव प्रचारात उतरले आहेत.

भास्कर जाधव शिवसेनेचे नेते असल्यामुळे त्यांच्यावर राज्यातील शिवसेनेच्या इतर उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी आहे. त्यामुळे गुहागरमधील प्रचाराची सर्वस्व जबाबदारी त्यांनी विक्रांत जाधव यांच्यावर सोपवली आहे. या मतदारसंघात येणाऱ्या चिपळूण तालुक्यातील गावांची जबाबदारी त्यांचे भाऊ सुनील जाधव यांच्याकडे आहे. खेड तालुक्यातील गावांची जबाबदारी मुलगा समीर जाधव पहात आहेत. महिलांच्या कार्यक्रमासाठी त्यांची पत्नी सुवर्णा जाधव हजेरी लावत आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजेश बेंडल यांच्या कुटुंबातील मात्र कोणीही प्रचारात आलेला नाही. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारासाठी त्यांचे वडील माजी मंत्री रामदास कदम प्रचारात उतरले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधत आहेत. योगेश कदम यांच्या पत्नी श्रेया कदम याही प्रचारामध्ये उतरल्या आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय कदम यांच्या पत्नी सायली पतीच्या प्रचारात उतरल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular