26.9 C
Ratnagiri
Sunday, July 20, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्याचा प्रचार अडकला स्थानिक मुद्यांवरच

रत्नागिरी जिल्ह्याचा प्रचार अडकला स्थानिक मुद्यांवरच

अनेक तालुक्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, रोजगार हे मूलभूत प्रश्न कायम आहेत.

जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. देश व राज्यपातळीवरील प्रचाराचे पारंपरिक मुद्दे आता मागे पडत असून गद्दारी, लाडकी बहीण व स्थानिक पातळीवरील मुद्यांवर प्रचार सुरू आहे. गावच्या विकासासाठी किती निधी आणला आणि किती कार्यकर्त्यांना ठेकेदाराना कामे दिली यावर प्रचार सुरू आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांचे मनोरंजनही केले जात आहे. यापूर्वी होत असलेल्या निवडणुकांमध्ये पक्षाचे व उमेदवाराचे जाहीरनामे महत्त्वाची भूमिका बजावत होते. या जाहीरनाम्यामध्ये आपण कोणते प्रश्न सोडवणार आहोत, याचा प्रामुख्याने उल्लेख उमेदवार करायचे; परंतु आता जाहीरनामे ही कल्पना मागे पडत असून कार्यअहवाल हा नवीन प्रकार मतदारांमध्ये तसेच उमेदवारांमध्ये रूढ होत आहे, आपण केलेल्या विकासकामांचा कार्य अहवाल उमेदवार मतदारांपुढे ठेवत आहेत. यामुळे स्थानिक व क्षुल्लक कामे आता प्रचाराचा मुद्दा ठरू लागली आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता मुंबई- गोवा महामार्गाचा महत्त्वाचा प्रश्न अनेक वर्षे रखडलेला आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे.

जिल्ह्यातील आरोग्य व शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. सागरी वाहतुकीचा प्रश्न तसेच मत्स्य दुष्काळाचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे. कोकण रेल्वे वाहतूक, कोलमडलेली बीएसएनएलची यंत्रणा, औद्योगिक विकासही मंदावलेला आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार या निवडणुकीमध्ये फारसा होताना दिसत नाही. मागील काही निवडणुकांमध्ये महागाई, भारनियमन, दहशतवाद, इंधन दरवाढ, शेतीसमस्या, पाणीटंचाई या राज्य पातळीवरील मुद्दे प्रामुख्याने प्रचाराचा भाग बनले होते; परंतु या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचाराचे ठोस मुद्दे सत्ताधारी व विरोधकांकडे फारसे दिसत नसल्याने स्थानिक विषयांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात. ज्या भागामध्ये उमेदवार आपली प्रचाराची सभा घेत आहेत अथवा विभागवार बैठका घेत आहेत त्या विभागाचे प्रश्न, समस्या व या गावांतील अडचणी आता प्रचाराचा मुद्दा होत आहे. समाजमंडप, सभागृह, स्वच्छतागृह, मंदिराचे बांधकाम अशा क्षुल्लक प्रश्नांमध्ये जसा मतदार अडकला आहे तसा उमेदवारही अडकलेला दिसत आहे.

शाळांच्या समस्यांपेक्षा मंदिराचा प्रश्न स्थानिक मतदारांना अधिक भावत आहे याशिवाय आपल्या मदतीला धावणारा माणूस, सुख-दुःखात सहभागी होणारा, दांडगा संपर्क साधणारा उमेदवार या अंगाने प्रचार चालला आहे. राज्य पातळीवरील व जिल्हा तालुका पातळीवरील प्रचाराचे अनेक मुद्दे आजही दुर्लक्षित राहिले आहेत. याही पुढे जात, गावबैठका, समाज बैठका यामध्ये प्रचाराची चक्रे फिरताना दिसत आहेत. गावाच्या अथवा समाजाच्या मागण्या यांना महत्व दिले जात आहे. त्यामळे एकत्रित विकासाची दिशा ठरवणारे प्रश्न प्रचारात येताना दिसत नाहीत. राज्य व देशपातळीवरील प्रचाराचे मुद्दे मागे पडत असून स्थानिक मुद्द्यांना महत्व दिले जात आहे. मतदारांनाही राज्य व देशपातळीवरील फारसे मोठे प्रश्न पडलेले दिसत नाहीत, त्यामुळे उमेदवारांचेही फावत आहे.

मूलभूत प्रश्न पडले मागे – जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, रोजगार हे मूलभूत प्रश्न कायम आहेत. सरकारी रिक्त पदांची समस्या सर्व ठिकाणी भेडसावत आहे. रखडलेल्या धरणांना न्याय देण्याची गरज आहे. औद्योगिक विकासही मंदावला आहे. शहरीकरणामुळे नवे नागरी प्रश्न निर्माण होत आहेत. या सर्व बाबींचा विचार गांभीर्याने होताना दिसत नाही. जिल्ह्याचा पर्यटन, कृषी विकास, प्रदूषणकारी कंपन्या वगळता औद्योगिक विकास, रोजगार, ग्रामस्थांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवणे असे मुद्दे प्रचाराकडे डोळे लावून बसले आहेत; पण प्रचार मात्र स्थानिक पातळीवर आणि गद्दारी, लाडकी बहीण अशा आरोप- प्रत्यारोपात अडकला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular