शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवारात आज कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन या फिरत्या रुग्णालयाची फीत कापून कर्करोग तपासणी मोहिमेचा प्रारंभपालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सामंत यांनी कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅनची पाहणी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप यांनी व्हॅनबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. या वेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, प्रांताधिकारी जीवन देसाई, राहुल पंडित, बंड्या साळवी, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये मे व जूनमध्ये प्रत्येक तालुक्यात गावभेटीतून व्हॅनमध्ये मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करून कर्करोगाचे निदान केले जाणार आहे.
विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत महत्त्वपूर्ण तपासणी सेवा पोहोचवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामुळे वेळेवर निदानात सुधारणा होईल आणि संभाव्यतः अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल. ही व्हॅन सामान्य कर्करोगांच्या तपासणीसाठी सुसज्ज आहे. ज्यात सुरुवातीला डिजिटल मशिन वापरून स्तनाच्या तपासण्या आणि कॉल्पोस्कोप वापरून गर्भाशयाच्या मुखाच्या तपासण्या यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तरी या मोफत संधीचा लाभ घेऊन नागरिकांनी मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आढावाही पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला.