गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून शहरात प्रचंड विकासकामे सुरू आहेत. रत्नागिरीतील पर्यटकांचा राबता लक्षात घेऊन मारुती मंदिर येथील सर्कलमध्ये मावळे, तारांगण, शिर्के उद्यानात उभारलेली विठ्ठलाची सर्वांत मोठी मूर्ती, जिजामाता उद्यानातील सर्वांत उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, तिथेच काढलेली छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दर्शवणारी भित्तीचित्रे, थिबापॅलेस येथील थ्रीडी मल्टीमीडिया शो अशा संकल्पना राबवण्यात आल्या आहेत. रत्नागिरी शहराकडे पाहण्याची पर्यटकांची दृष्टी सकारात्मक व्हावी हा त्यामागील उद्देश आहे. एमआयडीसीकडून मिळालेल्या ४०० कोटी निधीतून रत्नागिरी शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू झाली आहे. या सर्वांना रत्नागिरी शहरातील मोकाट गुरांमुळे गालबोट लागत आहे. एका खासगी संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये सुमारे साडेतीनशेहून अधिक मोकाट गुरे शहरातील साळवीस्टॉप, मारुती मंदिर, जेलनाका, आठवडा बाजार, भुतेनाका, भाजीमार्केट, लक्ष्मी चौक, मांडवी आदी परिसरात वावरत आहेत.
नाचणे रोडवरील आयटीआयसमोरील मोकळ्या जागेत शंभरहून अधिक मोकाट गुरांचा जणू अड्डाच झालेला आहे. दुपारी, रात्री मुख्य मार्गावर या मोकाट गुरांचा कळप ठिय्या पाहायला मिळतो. त्यामुळे अनेकवेळा वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागते. अचानक गुरे वाहनासमोर आल्याने अपघातालाही सामोरे जावे लागते. या समस्येकडे पालिका प्रशासनाने डोळेझाक केली आहे. जाळी बसवून परिसर बंदिस्त केला गेला. गुरांना उन्हाचा किंवा पावसाचा त्रास होऊ नये यासाठी पत्रा टाकून शेडही उभारली गेली. खाण्यासाठी गवत, पिण्यासाठी पाणीही उपलब्ध करून दिलेले होते तसेच देखरेख करण्यासाठी रखवालदाराचीही नेमणूक केली गेली होती. त्याला राहण्यासाठी स्वतंत्र खोली होती. शहरातील मोकाट गुरे पकडून तिथे ठेवण्याची सर्व जबाबदारी पालिकेकडे दिली गेली; परंतु त्याचा सर्वच भार पालिका प्रशासनावर पडू लागल्याने त्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यामुळे गुरे मोकाट आणि निवाराशेड भकास अशीच स्थिती रत्नागिरी शहरात पाहायला मिळत आहे.
रत्नागिरी शहरातील या गंभीर समस्येकडे शासकीय यंत्रणांनी डोळेझाक केली असतानाच आता लोकप्रतिनिधी तरी लक्ष देतील, अशी अपेक्षा रत्नागिरीवासीयांकडून व्यक्तं केली जात आहे. तीन वर्षांपूर्वी झाडगांव परिसरात मोकाट गुरांच्या झुंजीमुळे एकाचा बळी गेला होता. आता पुन्हां अशीच काहीशी स्थिती निर्माण झालेली, आहे. मोकाट गुरांमुळे रत्नागिरीत येणारा पर्यटक नकारात्मक प्रतिक्रिया देत आहे. त्यामुळे पालिकेने वेळीच लक्ष देऊन मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रत्नागिरी करत आहे तसेच पालकमंत्र्यांनीही याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दृष्टिक्षेपात – रत्नागिरी जिल्हा नियोजनामधील तरतूद केलेला निधी जातोय वाया. पालिकेत आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींची जाणवतेय उणीव. रत्नागिरी शहर परिसरात साडेतीनशेहून अधिक मोकाट गुरांचा राबता. मोकाट गुरांमुळे शहर परिसरात वाहतूककोंडीसह अपघाताची भीती. कोकणात मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया.