जिंदल पोर्ट वायूगळती प्रकरण चिघळले आहे. सुरक्षेच्या मुद्द्यावर स्थानिक चांगलेच संतापले आहेत. चौकशी समितीपुढे गुरुवारी जयगड येथे झालेल्या बैठकीत सुमारे ४० मागण्या ग्रामस्थांनी समितीपुढे ठेवल्या. आरोग्यविषयक मागण्या तत्काळ सोडविण्यासंदर्भात समितीने आश्वासन दिले. वायू गळतीच्या तांत्रिक तपासासाठी चौकशी समितीने केमिकल इंजिनिअरना बोलावले आहे. वेळप्रसंगी घटना घडली त्यावेळचे सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती चौकशी समिती समन्वयक तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी दिली. जिंदल वायू गळतीप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशीसमितीबरोबर चर्चा करण्याची मागणी जयगड येथील ग्रामस्थ, माध्यमिक विद्यामंदिरमधील शालेय समितीने केली होती. त्यानुसार आज अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, समन्वयक प्रांताधिकारी जीवन देसाई, पोलिस अधिकारी, आदी उपस्थित होते.
कालच ग्रामस्थांनी कंपनीने गॅस वाहतूक व गॅस साठवणूक त्वरित बंद करावी, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा कायम मेडिक्लेम काढावा, भविष्यात उद्भवणाऱ्या आजारपणाची जबाबदारी कंपनीने घ्यावी, कंपनीच्या आवारात सुसज्ज रुग्णवाहिका व त्यावर तज्ज्ञ डॉक्टर कायमस्वरूपी उपलब्ध ठेवावा, कंपनीने १०० खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल सुरू करावे, डॉक्टरांना ऊर्जा हॉस्पिटलमधून काढून टाकावे, आदी मागण्यांसाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. कंपनीकडून लेखी आश्वासन मिळत नसल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. आज पुन्हा चौकशी समितीपुढे ग्रामस्थ आणि शालेय समितीचे लोक आले. त्यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये कंपनीकडून होणाऱ्या चालढकलीबाबत नाराजी व्यक्त केली गेली; परंतु चौकशी समितीने परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. स्थानिकांच्या आरोग्याबाबतच्या मागण्या तत्काळ सोडविण्याबाबत समितीने आश्वासन दिले; परंतु अन्य मागण्यांबाबत कंपनी आणि प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
गळती कोठून ? हे गुलदस्त्यात – समितीने कंपनीला भेट दिली. वायू गळती नेमकी कुठून झाली, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. याची तांत्रिक माहिती देण्यासाठी कंपनीने केमिकल इंजिनिअरना बोलावले आहे. तसेच चौकशी समितीनेदेखील केमिकल इंजिनिअरना बोलावले आहे. त्यामुळे वायू गळती कशी झाली, हे समजणार आहे. तसेच वेळ पडल्यास ज्या दिवशी ही घटना घडली, त्यादिवसाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले जाणार आहे.