रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्यांनी कोकण दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून घेऊन वेतन वाढीची मागणी केली. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याची मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी देईल, असे आश्वासन दिले.
रत्नागिरी दौऱ्यादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्या वेळी युवानेता अनिकेत सावंत यांनी एसटी विभागीय कार्यालयाबाहेर एसटीची आकर्षक प्रतिकृती भेट दिली. ही प्रतिकृती शिंदे यांना खूपच आवडली आणि त्यांनी सावंत यांचे तोंड भरून कौतुक केले. शासकीय विश्रामगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देताना सूर्यकांत साळवी, मंगेश देसाई, उदय कदम, राजेश तथा नाना मयेकर, बंटी विश्वासराव, सचिन वायंगणकर, आनंद काताळकर, अनिकेत सावंत उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, एसटी कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती केल्याने शासकीय कर्मचारी व रा. प. कर्मचारी यांच्या वेतनामध्ये ५, ६वा आणि ७वा वेतन आयोग देताना फार मोठी तफावत निर्माण झाली. रा. प. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ ही वेतन आयोगाप्रमाणे न होता ती चुकीच्या पद्धतीने झाल्याने त्यांचे जीवनमान खालावले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या अभूतपूर्व संपानंतर कर्मचारी शांत राहिले होते. यानंतर राज्यात सत्तांतर झाले. संप मिटल्यानंतर पाच महिने कोणत्याही संघटना वेतनवाढ किंवा आयोग लागू करण्याबाबत बोलत नव्हत्या. यामुळे निवृत्त कर्मचारी संतोष शेट्ये, रत्नागिरी आगारातील विभागीय भांडार शाखेतील चालक मंगेश देसाई यांनी मंत्री उदय सामंत यांच्याशी वारंवार हा विषय मांडण्याकरिता बैठक बोलावण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सामंत यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे नियोजन केले.