राज्यात तापमान, वाढीला लागले असतानाच मार्च महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावली. मात्र, आता पुन्हा एकदा तापमान वाढत असून विदर्भात पारा ४२ अंश सेल्सिअस पलीकडे गेला आहे. भारतीय हवामान खात्याने आठवड्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरीही येत्या दोन-तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असतानाच कोकणासह विदर्भातही शुक्रवारपासून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात तापमानाच्या पाऱ्यात वेगाने वाढ होत आहे.
कमाल तापमानासह किमान तापमानदेखील वाढत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तापमानाच्या पाऱ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मंगळवारी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे ४२.३ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. तर वर्धा, यवतमाळ, वाशीम आणि अकोला शहरात तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक होता. भारतीय हवामान खात्याने एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची इशारा दिला आहे.
४ दिवस पावसाचा इशारा – सरासरी पेक्षा तापमान अधिक राहण्याची शक्यता असल्याने यावर्षी विदर्भात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसहुन अधिक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, तापमानवाढीचा आलेख वर जात असताना येत्या शुक्रवारपासून चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण आणि मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. यावेळी तापमानात मात्र फारशी घट होणार नाही.