अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट २९ एप्रिलला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे सगळीकडे जोरदार प्रमोशन सुरू आहे. आणि विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. मराठी मनोरंजन विश्वामध्ये पहिल्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाचे पोस्टर विमानावर झळकले आहे.
विमान कंपनी स्पाईसजेटच्या विमानावर ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे पोस्टर झळकले. हा मान मिळवणारी अमृता खानविलकर ही पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे. या प्रमोशनसाठी अमृता आणि आदिनाथ स्वत: विमानतळावर उपस्थित होते. अमृता त्यावेळी सुद्धा चंद्राच्या भूमिकेमाध्येच असून, तिने लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती.
अमृता आणि मराठी मनोरंजन विश्वासाठी ही अभिमानाची गोष्ट असून अनेकांनी यासाठी अमृताचे कौतुक केले आहे. या प्रमोशनसाठी अमृता आणि आदिनाथ यांनी गुरुवारी सकाळीच एअरपोर्टवर हजेरी लावली होती. हे दोघेही विमानतळावर आल्याची माहिती अमृताने लगेज ट्रॉलीवरून आदिनाथ तिला घेऊन फिरतानाचा स्वतः एक गमतीशीर व्हिडिओ पोस्ट करून दिली होती. पुढे काही वेळातच ‘चंद्रमुखी’ची टीम धावपट्टीवर दाखल झाली. यावेळी स्पाईसजेटच्या विमानावर ‘चंद्रमुखी’चे पोस्टर झळकवण्यात आले. हे पोस्टर पाहून अमृताही खूपच भारावून गेली. यावेळी अमृताने विमानाजवळ जाऊन ‘चंद्रा’ची साइन पोज दिली.
‘कच्चा लिंबू’ आणि ‘हिरकणी’ सारखे लोकप्रिय चित्रपट देणारा अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट विश्वास पाटील लिखित याच नावाच्या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित आहे. त्यामुळे चंद्राचा जलवा चित्रपट गृहामध्ये कितपत चालतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.