रजिस्ट्रार ऑफिसमधील सर्वर डाऊन असल्यामुळे कामांना होणाऱ्या विलंबाबाबत व गैरसोयीबाबत क्रेडाई संघटनेच्यावतीने जिल्हधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या गैरसोयी दूर करण्याबाबत तातडीने पाऊल उचलावे अशी मागणीही करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक महसूल देणाऱ्या क्षेत्रापैकी एक क्षेत्र म्हणजे बांधकाम व्यवसाय आहे. हा सर्व महसूल रजिस्ट्रार ऑफिस द्वारे वसूल केला जातो. बांधकाम व्यावसायिक ग्राहकांसोबत वेळ ठरवून रजिस्ट्रेशन करण्यासाठी या कार्यालयात येत असतात. खरेतर रजिस्ट्रेशन प्रोसेसचे काम १० मिनिटांचे असते.. परंतु अनेकदा या कार्यालयात सर्वर डाऊन असतो किंवा अतिशय धीम्या गतीने काम चालते.
कधी कधी लाईट सुद्धा नसतो. या सर्व कारणांमुळे १० मिनिटांच्या कामासाठी कधी कधी ३ ते ४ तास लागतात काही वेळा दुसरा दिवसही उजाडतो. ज्या ग्राहकांमुळे शासनाला सर्वात जास्त महसूल मिळतो त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दरम्यान या प्रतिक्षेच्या काळामध्ये ग्राहकांना व बांधकाम व्यावसायिकांना याठिकाणी बसण्याची चांगली व्यवस्थाही नाही. तसेच पिण्याचे पाणी व प्रसाधनगृहाचीसुद्धा सुविधा नाही. या सर्व गैरसोयीमुळे बांधकाम व्यावसायिक व सोबत येणाऱ्या ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी व असंतोष आहे. जिल्हधिकाऱ्यांना याची दखल घ्यावी,’ व येथील गैरसोयी दूर कराव्यात अशी मागणी करण्यात आल्याची माहिती क्रेडाई रत्नागिरीचे सेक्रेटरी सुमित ओसवाल यांनी दिली आहे.