मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (ता. ३०) लोटे (ता. खेड) आणि रत्नागिरीत येणार असून, त्यांच्या हस्ते लोटे येथे कोका कोलाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. कोका कोला प्रकल्प अडीच हजार कोटींचा आहे. साडेतीन हजार जणांना रोजगार मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण प्रमुख उपस्थित राहणार असल्याची वैद्यकीय महाविद्यालयाच्या दालनात आज सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची वचनपूर्ती होणार असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, “लोटे एमआयडीसीत येणाऱ्या कोकाकोलाच्या अडीच हजार कोटींच्या नवीन प्रकल्पामुळे जिल्ह्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साडेतीन हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन सकाळी ११ वाजता होणार आहे. या प्रकल्पासह अनेक उद्योगासह मँगोपार्क व मरीन पार्कही सुरू झाल्यावर सुमारे दहा हजारांवर रोजगार उपलब्ध होतील. उद्योगमंत्रिपद स्वीकारल्यानंतर यापूर्वी येण्यास उत्सुक असल्यापासून नवीन येणाऱ्या प्रकल्पांसाठी पाठपुरावा केला. त्याचमुळे कोकाकोला कंपनी येत्या काही महिन्यात सुरू होईल. या ठिकाणी तयार होणारा माल गोवा, कर्नाटकसह अन्य राज्यात जाणार आहे.”
भविष्यात कोला कंपनीच्या प्रकल्पाचा विस्तार रत्नागिरीत व्हावा, म्हणूनही आपण कोकाकोलाच्या संचालकांसमवेत चर्चा करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात अन्य एमआयडीसी भागात सुमारे ६ लाख ९८ हजार ५९४ चौरस मीटरची जागा उद्योजकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातून पाच हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी छोटे मोठे असे सुमारे दोन हजार कोटींचे प्रकल्प उभे राहणार आहेत, असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. निवेंडी येथे दोनशे कोटींचा मँगोपार्क तर दापोलीमध्ये मरीन पार्क उभे करण्याच्या हालचाली अंतिम टप्यात आल्या. याठिकाणी पाच हजार जणाना रोजगार उपलब्ध होतील. यासाठी आवश्यक जागांचे दर लवकरच निश्चित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नमो ११ सूत्री कार्यक्रमाचा प्रारंभ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त नमो ११ हा कार्यक्रम शासनाने राबवला आहे. ज्या सर्वसामान्यांसाठी हा कार्यक्रम आहे, त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातला पहिला कार्यक्रम रत्नागिरीत होत आहे. कार्यक्रमांतर्गत महिला सक्षमीकरणासाठी साडेनऊ कोटी रुपये दिले आहेत. महिला बचत गटांसाठी काम करणाऱ्या सीआरपींसाठी मोबाईल देण्याचा कार्यक्रमाचा आरंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. दिव्यांगशक्ती अभियानांतर्गत दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. दोन हजार कामगारांना किटचे वाटप केले जाणार आहे.
नमो शेततळे कार्यक्रमांतर्गत दोन शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. आत्मनिर्भर सौरऊर्जा योजनेतंर्गत गोळप व शृंगारतळी (गुहागर) येथे सौरप्रकल्प उभारणी, ग्रामसचिवालय अभियान, नमो स्मार्ट शाळा अभियान, जिल्हा क्रीडा संकुल, राजापूर व चिपळूणमधील क्रीडा संकुल उभारणीच्या कामाचा शुभारंभ, नमो मागासवर्गीय सन्मान योजना कामांचा ऑनलाईन प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.