मुख्यमंत्र्यांचे चिपळूण शहराला मोठे गिफ्ट विकासकामांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर

125
Chief Minister approves funds of crores for development works

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूण शहराला मोठे गिफ्ट दिले आहे. माजी नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार चिपळूण शहरातील विविध ५६ विकासकामांसाठी तब्बल १२ कोटी ६१ लाखाचा निधी मंजूर करून दिला आहे. माजी मंत्री रामदास कदम तसेच आमदार योगेश कदम यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना या निमित्ताने मोठे यश आले असून शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. चिपळूण शहरासाठी आतपर्यंत एकाचवेळी मिळालेला हा पहिला सर्वाधिक निधी ठरला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांनी मिळवले. साहजिकच शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच अन्य पक्षातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधीनी देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.चिपळूण मधील काँग्रेस तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनी माजी मंत्री रामदास कदम, आमदार योगेश कदम यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला होता, उद्योजक नासिरभाई खोत यांनी त्यावेळी पुढाकार घेतला होता. चिपळूण शहरातील विविध विकास कामासाठी निधीची मागणी नगरसेवकांनी त्याचवेळी केली होती.

प्रस्ताव पाठवा चिपळूण शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी नगरसेवकांना दिले होते. त्यानुसार शहरातील विकास कामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले होते. या विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी आमदार योगेश कदम सतत पाठपुरावा करत होते. दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करून देणारच, आणि मुख्यमंत्री ते पूर्ण करतील असा विश्वास योगेश कदम वारंवार देत होते.आता मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. माजी नगरसेवक यांच्या मागणीनुसार व दाखल केलेल्या प्रस्तावांची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूण शहरातील विविध ५६ विकासासाठी १२ कोटी ६१ लाख इतका निधी मंजूर केला असल्याची माहिती उद्योजक नासिरभाई खोत यांनी दिली आहे. त्यामुळे माजी मंत्री रामदास कदम, आमदार योगेश कदम यांचे आभार मानले आहेत. तर शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनी देखील समाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी विश्वास सार्थ ठरवला आशा भावना व्यक्त केल्या आहेत.