26.5 C
Ratnagiri
Friday, March 14, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeRatnagiriरत्नागिरीतील चिमुरडीचा सतान प्राप्तीसाठी गोव्यात नरबळी

रत्नागिरीतील चिमुरडीचा सतान प्राप्तीसाठी गोव्यात नरबळी

लग्नाला २० वर्षे उलटली तरी त्याच्या घरात पाळणा हलला नव्हता.

मूलबाळ होत नसलेल्या एका दांपत्याने गोव्यात एका भगताच्या सल्ल्यानुसार नरबळी दिल्याचे उघडकीला आले आहे. धक्कादायक म्हणजे ज्या चिमुरडीचा बळी देण्यात आला, ती चिमुरडी रत्नागिरीतील असल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान ज्यांनी या चिमुरडीचा बळी घेतला त्या नवरा-बायकोला फोंडा-उसगांव पोलीसांनी अटक केली असून त्यांची रवानगी ६ दिवसांसाठी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. तिचे नाव अमैरा असल्याचे पोलीसांनी सांगितले. पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, अमैरा ही चिमुरडी आपली आई व आणखी एका लहान बहिणीसमवेत गोव्याला तिच्या आजीकडे राहत होती. काही वैयक्तिक कारणास्तव ही महिला आपल्या दोन्ही मुलींना घेऊन रत्नागिरीतून गोव्याला उसगाव येथे रहायला गेली होती. अमैराचे वडील मात्र रत्नागिरीत राहतात. दोन दिवसांपूर्वीच ते गोव्याला येऊन गेले होते. कसलये तिस्क या परिसरात हे सर्वजण राहत होते. कसलये तिस्क हा परिसर फोंड्यातील झोपडपट्टी सदृश्य भाग म्हणून परिचित आहे. या परिसरात बिगर गोमंतिकांचा भरणा आहे.. याच परिसरात एका घराजवळ गुरूवारी काही जणांना एक मृतदेह पुरलेला आढळला. हा मृतदेह एका ४ ते ५ वर्षांच्या बालिकेचा असल्याचे दिसताच हा काहीतरी जादूटोण्याचा प्रकार असावा असा संशय त्यांना आल्याने पोलीसांना खबर देण्यात आली. उसगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चौकशी सुरू झाली.

मुलगी बेपत्ता – तपास करताना याच परिसरात राहणारी मुलगी बुधवारपासून बेपत्ता असल्याचे पुढे आले. तिचा शोध सुरू होता. विशेष म्हणजे जिथे हा मृतदेह पुरलेला आढळला, त्या घरापासून ५० मीटर अंतरावर अमैरा आपल्या आई आणि बहिणीसोबत राहत होती. पोलीसांनी तिच्या आईला घटनास्थळी बोलावले. तिने मृतदेह पाहताच ओळखला आणि अक्षरशः हंबरडा फोडला.

चित्रपटाला साजेशी कहाणी – पुढील शोधकार्य हे एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी कहाणी आहे. पूजा आणि पप्पू अलहड या निपुत्रिक दांपत्याने अमैरा हिला शोधले. आपल्या नरबळीसाठी ती योग्य असल्याचे कळताच तिला कुणाच्याही नकळत पळवले. नरबळी दिला आणि मृतदेह पुरला. त्यानंतर जणू काहीच झाले नाही अशा आविर्भावात हे दोघेही वावरत होते.

सहानुभूती दाखवायला आली – धक्कादायक म्हणजे पूजा आणि पप्पू हे दोघंही ज्याठिकाणी मृतदेह सापडला त्याठिकाणी अन्य लोकांसमवेत आले आणि आपला काही संबंध नाही, असे भासवत त्या कुटुंबियांचे सांत्वन देखील करत होते. दरम्यान असे असले तरी या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने त्यांचा घात केला.

सुतावरून स्वर्ग गाठला – या सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करत उसगाव पोलीसांनी सुतावरून स्वर्ग गाठत आरोपींना पकडले. पोलीसांच्या चाणाक्ष नजरेतून पूजा आणि पप्पू सुटले नाहीत. त्यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि पोलीसांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांची ततपप…. उडाली. पोलीस जे काही समजायचे ते समजून चुकले आणि त्यांनी खाक्या दाखवत अधिक चौकशी केली असता हे कृत्य आपणच केल्याची माहिती या दांपत्याने चौकशीत दिल्याचे पोलीसांनी पत्रकारांना सांगितले.

मोबाईलवर खेळत होती – ज्यावेळी अमैराला या दांपत्याने पळवले त्यावेळी तिची आई तिच्या छोट्या बहिणीला घेऊन एका रूग्णालयात आपल्या नातेवाईकांची चौकशी करण्यासाठी गेली होती. अमैरा घरी मोबाईलवर खेळत होती. आजी कामात मग्न होती. हाच डाव साधत पूजाने अमैराला उचचले आणि पळविले. पप्पूदेखील त्याच परिसरात होता. या दांपत्याने त्या मुलीवर २ ते ३ दिवस लक्ष ठेवलेले असावे. त्यानंतर त्यांनी तिला पळविण्याचा प्लॅन आखला आणि तो अंमलात देखील आणला. दृश्यम चित्रपटात जे चित्र दाखविले आहे, त्यासारखीच ही स्टोरी प्रत्यक्षात घडली आहे. प्रकाराचा उलगडा झाला.

पळण्याचा बेत फसला – नरबळी देऊन झाल्यानंतर पूजा आणि पप्पू मिरजला पळून जाणार होते. मात्र त्याआधीच पोलीसांनी त्यांना पकडले आणि अंधश्रध्देचा बाजार उघड झाला.

घरात २० वर्षे पाळणा हलला नव्हता – पप्पू ऊर्फ बाबासाहेब हा एक उत्कृष्ट वेल्डर आहे. हे कुटुंबिय मुळचे मिरज येथील आहे. गोव्यात ते कामधंद्यानिमित्त आले. कसलये येथे राहण्यापूर्वी तो धारबांदोडा संजीवनी साखर कारखान्याजवळ राहत होता. लग्नाला २० वर्षे उलटली तरी त्याच्या घरात पाळणा हलला नव्हता. त्यामुळे त्याने आपल्याला जादूटोण्याने मूल व्हावे व घरात समृद्धी यावी यासाठी हे अघोरी कृत्य केले असावे असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस त्या दृष्टीने चौकशी करत आहेत.

अघोरी कृत्य करणाऱ्यांना कडक शासन करा – फोंड्यासारख्या सुशेगाव भागात झालेल्या या नरबळीच्या प्रकाराने संपूर्ण गोव्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान ज्या भागात हा प्रकार घडला त्या उसगाव गांजे पंचायतीचे सरपंच रामनाथ डांगे यांनी अशा प्रकारे अघोरी कृत्य करणाऱ्याला कडक शासन झालेच पाहिजे. हे गुन्हेगार कोणत्याही परिस्थितीत सुटता कामा नयेत. एका चिमुरडीचा हकनाक बळी गेला हे दुर्दैवी आहे असे म्हटले आहे.

रात्रीच पुरला मुलीचा मृतदेह – पप्पू उर्फ बाबासाहेब आणि त्याच्या पत्नीने पाण्यात बुडवून मुलीला मारल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. शवविच्छेदनाच्या अहवालातही पाण्यात गुदमरुन मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. खरेतर बुधवारीच पप्पूने आपल्या पत्नीच्या सहकार्याने अमैरा हिला ठार मारून तिचा मृतदेह घरातच ठेवला होता. मात्र पोलिस चौकशीला आल्यानंतर रात्रीच खड्डा खणून त्यात तो मृतदेह पुरला. शुक्रवारी सकाळी पोलिस चौकशीत त्याने ही कबुली दिली आणि अमैराच्या गायब होण्याच्या प्रकाराचा उलगडा झाला.

RELATED ARTICLES

Most Popular