गुहागरमध्ये एका तरूणाने अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक कृत्य केले आहे. समुद्रकिनारी फिरण्याच्या बहाण्याने घेऊन जाऊन अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे गुहागरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून एका २९ वर्षीय तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित २९ वर्षीय तरूणाविरूद्ध हा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली. आरोपीने एका १५ वर्षीय मुलीला समुद्र किनारी फिरायला जाण्याच्या बहाण्याने नेले. तेव्हा तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. रविवारी मुलीला घेऊन आरोपी समुद्र किनारी फिरायला गेला. फिरून झाले की तिला पिक्चर बघायला जाऊ म्हणून थिएटरजवळ घेऊन गेला. परंतू थिएटर बंद असल्यामुळे तो पुन्हा तिला समुद्र किनारी घेऊन गेला.
अल्पवयीन मुलगी त्याच्यावर विश्वास ठेऊन पुन्हा त्याच्याबरोबर गेली असता त्याने तिचा गैरफायदा घेतला असा आरोप मुलीच्यावतीने देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. समुद्रावर जाताच त्याने तिला गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर तिला एका अज्ञात “ठिकाणी लॉजवर घेऊन गेला आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. मुलगी रात्रभर बेपत्ता असल्यामुळे तिच्या घरातल्यांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. पालकांसह तिच्या वाडीतील इतर मंडळींनी अक्षरशः गाव पालथे घातले. पहाटे ३ वाजेपर्यंत पालक ग्रामस्थांसह तिला संपूर्ण किनारपट्टीवर शोधत होते. पण मुलीचा काही पत्ता लागत नव्हता. शेवटी सकाळी तिच्या पालकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवली. परंतू, तोपर्यंत मुलगी घरी परतली. घराल्यांनी फोन करून कळवल्यावर पालक तातडीने घरी परतले. मुलीला जाब विचारताच तिने सर्व घटना सांगितली. त्यानंतर मुलीला पालकांनी त्वरीत पोलीस ठाण्यात नेलं आणि आरोपीविरूद्ध तक्रार नोंदवली. मुलीच्या तक्रारीनुसार २९ वर्षीय तरूणाविरूद्ध गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

