जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चिपळूण पोलीस ठाणे हद्दीतील मार्गताम्हाणे, गुढेफाटा ते पाथरटी येथील रस्त्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तिंकडून बिबट्याचे कातडे, चार जिवंत काडतुसे आणि दोन परवाना नसलेल्या बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे व्यक्तींकडून वापरण्यात आलेली स्प्लेंडर मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
सचिन संतोष गोठल वय २३, रा. मौजे मुरडे, शिंदेवाडी, ता. खेड याच्या घरी छापा टाकला असता त्याच्या घरातून एक विनापरवाना असलेली बंदूक पोलिसांनी हस्तगत केली, अशी माहिती खेड पोलीस ठाण्याचे सपोनि सुजित गडदे यांनी दिली. ही बंदुक पांडुरंग केशव सुतार ऊर्फ मेस्त्री वय ५३, रा. तळवडपाल, उपळेवाडी, ता. खेड याच्याकडून खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी पांडुरंग केशव सुतार ऊर्फ मेस्त्री याच्या घरी छापा टाकला. त्यावेळी दोन बंदुका व बंदूक निर्मितीसाठी आवश्यक असणारे साहित्य जप्त करण्यात आले.
या घटनेबाबत खेड पोलीस ठाण्याचे संकेत विजय गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाणे गु.नों.क्र. ११५/२०२२, भारतीय हत्यार कायदा कलम ३,५,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज न्यायालयासमोर आरोपी सचिन संतोष गोठल आणि पांडुरंग केशव सुतार ऊर्फ मेस्त्री यांना हजर करण्यात आले असता, या दोघांना १४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
या गुन्ह्याचा शोध पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांचे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत काशीद आणि खेड पोलीस ठाण्याचे पोनि श्रीमती निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुजित गडदे, पो. हवालदार विक्रम बुरोंडकर, पोलीस शिपाई संकेत गुरव, रोहित जोयशी, मपोशि किरण चव्हाण यांनी सहभाग घेतला.