रत्नागिरी मध्ये सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. चोरटे बरोबर लक्ष ठेवून बंद घरे, वृद्ध मंडळी घरामध्ये असतील, नोकरदारांचे कामा धंद्यासाठी घराबाहेर पडण्याच्या वेळा लक्ष ठेवून चोऱ्या करतात. दिवसा ढवळ्या देखील चोऱ्यामाऱ्या करण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. परंतु, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अशा भुरट्या चोराना पकडण्यात यश मिळते आहे. आणि पोलिसांच्या त्वरित कार्यवाहीमुळे चोरांना सुद्धा एक प्रकारे जरब बसली आहे.
रत्नागिरी शहरातील किर्तीनगर येथे घराचे स्लाईडिंग खिडक्या उचकटून चोरट्यांनी सुमारे ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी राहील हुसैन मुकादम वय ४३, रा. अजमेरीनगर रत्नागिरी यांनी शहर पोलिसामध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार प्रथम पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी किर्तीनगर येथे नवीन घराचे बांधकाम केले होते. चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये ४ सिलींग फॅन, शॉवर ड्रायव्हर, इलेक्ट्रिक स्विच बॉक्स, इलेक्ट्रिक सॉकेट, बंडल पोलीकॅम्प, ड्रील मशीन आदींचा समावेश आहे. या घराचे स्लाईडिंग खिडक्या उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि आतील तब्बल ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
पोलिसांनी लगेचच आपली चक्रे फिरवली असता, संशयित म्हणून इम्तियाज मलीक जान शेख वय २५, रा. क्रांतीनगर रत्नागिरी याला ताब्यात घेतले आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन दिवस सतत संशयिताने मुकादम यांच्या घरातील सामान चोरल्याचे निदर्शनास आले आहे.