चिपळूणमधील नागरिकांचा लांबचा प्रवास सुलभ आणि सोयीचा करण्यासाठी येथील आगारात लवकरच इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यामुळे इंधनाची बचत होईल आणि नागरिकांचा प्रवास ही सुलभ होणार आहे. महाराष्ट्राची शान असलेली ‘लालपरी’ चिपळुणात अजूनही वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या प्रवाशांकरिता जात आहे. आर्थिक तोटा सहन करून ग्रामीण भागात वस्तीसाठी एसटी पाठवली जात आहे. त्यामुळे सकाळी लवकर कामावर येणाऱ्या लोकांची गैरसोय ही दूर होत आहेच, मात्र मागच्या काही दिवसांपासून लाल परीला आर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. चिपळूण आगारातील गाड्यांची अस्वच्छता, अनेक गाड्या मोडकळीस आलेल्या होत्या शिवाय काही गाड्या मध्येच बंद पडत होत्या.
त्यामुळे प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत होती. याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत होता. चिपळूण आगारात मागील आठ वर्षांपासून नवीन गाड्या दाखल झालेल्या नाहीत. जुन्या गाड्यांवर येथील एसटीची सेवा सुरू आहे. ग्रामीण भागातील रस्त्यावर् जुन्या गाड्या सोडल्या तरी नागरिक त्यातून प्रवास करतात; मात्र मोठ्या शहरांमध्ये पाठवण्यासाठी चांगल्या गाड्यांची गरज असते. त्यामुळे चांगल्या गाड्या याव्यात, अशी येथील आगाराची मागणी होती. कोरोना काळात ग्रामीण भागातील अनेक एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. आगारप्रमुख दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्या हळूहळू पूर्वपदावर आल्या आहेत. गणेशोत्सव काळात एसटीने चांगले उत्पन्न मिळवले.
त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी चिपळूण एसटीच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. या बसेस या पूर्णपणे वातानुकूलित यंत्रणांच्या असणार आहेत. त्यामुळे चिपळूणमधील नागरिकांचा प्रवास आता थंडगार आणि आणखी सुखद होणार आहे. चिपळूण आगाराच्या आवारात ई-बससाठी आवश्यक असणारी चार्जिंग पॉइंटची सुविधासुद्धा करण्यात येणार आहे.