मागील वर्षी चिपळूण शहरामध्ये आणि परिसरातील भागामध्ये महापुराची परिस्थिती निर्माण झालेली. परंतु यंदा मुसळधार पाऊस पडून सुद्धा चिपळूण शहरात अजून पाणी भरले नाही, त्याचा योग्य निचरा झाला. पण आत्ता या दोन्ही नद्यांमधून गाळ काढण्याच्या कामावरून नेमका श्रेयवाद सुरू झाला आहे. नाम फाऊंडेशनने लोकसहभाग आणि शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढला. त्यामुळे यावर्षी चिपळूण शहरात पाणी भरले नाही, असा दावा नाम फाऊंडेशनकडून केला जात आहे. तर गाळ काढण्याच्या कामाचे श्रेय शासकीय यंत्रणा आणि स्थानिकांचे आहे, असा दावा चिपळूण बचाव समितीकडून केला जात आहे.
नाम फाऊंडेशनचे चिपळुणातील पदाधिकारी, फाऊंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर सोशल मिडियाच्या माध्यमातून नाम फाऊंडेशनने लोकसहभाग आणि शासनाच्या मदतीने चिपळुणातील नद्यांमधून गाळ उपसला त्यामुळे या पावसाळ्यात चिपळुणात पूर आला नाही, असा दावा करत आहेत. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे म्हणाले, नाम फाऊंडेशनचे कार्य खूप मोठे आहे. यावर्षी चिपळूणमध्ये पूर आला नाही. कारण तिथे नाम फाऊंडेशनने लोकसहभाग आणि प्रशासनाच्या मदतीने वाशिष्ठी आणि शिवनदीचा काळ काढला. या नद्यांचे रूंदीकरण केले. नाम फाऊंडेशनने सहा महिने चिपळूणमध्ये काम केले. त्यामुळे आता चिपळूणमध्ये पूर परिस्थिती उद्भवली नाही.
त्यावर चिपळूण बचाव समितीचे सदस्य सतीश कदम म्हणाले, वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढण्याचे एकूण तीन टप्पे आहेत. गोवळकोट ते बहाद्दूरशेख नाका या पहिल्या टप्प्यात शिवनदीतील गाळाचा समावेश आहे. यावर्षी सहा लाख क्युबिक मीटर गाळ काढून पहिल्या टप्प्यातील ९० टक्के काम झाले आहे. यासाठी महसूल, पाटबंधारे विभाग, भूमिअभिलेख, चिपळूण पालिका आणि इतर शासकीय यंत्रणांनी योग्य वेळी काम केल्याने मोठे यश प्राप्त झाले आहे.