पहिल्याच पावसात चिपळूण शहरात विचित्र चित्र दिसून आले. महामार्गाच्या कामात बांधण्यात आलेली गटारे अनेक ठिकाणी फुटली. काही ठिकाणी नाले तुंबले. त्यामुळे शहरातील परशुराम नगर येथे अनेक घरात पाणी शिरले. चार ते पाच घरात अक्षरशः दोन ते अडीच फुट इतके पाणी घुसल्याने त्या कुटुंबाची धावपळ उडाली. अखेर नगरपालिका अधिकारी व संबंधित ठेकेदार आणि महामार्ग विभाग अधिकाऱ्यांनी धाव घेऊन समस्या निवारण केले. मात्र पहिल्याच पावसात महामार्ग कामाचे पितळ उघडे पडल्याचे चित्र होते. चिपळूण शहर आणि ग्रामीण भागात शुक्रवारी मध्यरात्री पासून मान्सूनचे आगमन झाले. पहाटे पर्यंत रिमझिम स्वरूपात पाऊस पडत होता. नंतर काहीशी उसंत घेतल्यानंतर पावसाने दमदार सुरुवात केली. उपनगरात पावसाचा जोर अधिक राहिला. त्यामुळे सर्वच ठिकाणी पाणीच पाणी असे चित्र दिसून येत होते. परंतु या पावसाने चिपळूण शहरातील उपनगर असलेल्या कावीळतळी परशुराम नगर परिसरात चांगलीच धावाधाव उडवून दिली.
चिपळूण शहरांतर्गत येणाऱ्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम सद्या युद्धपातळीवर सुरू आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला गटारे बांधण्यात आली आहेत. तसेच सर्विस रोडचे काम देखील पूर्णत्वाकडे गेले आहे. परंतु त्या गटारांचे काम किती तकलादू आहे. हे शनिवारी अडलेल्या पावसाने दाखवून दिले. परशुराम परिसरात गटारे अक्षरशः फुटली तर काही ठिकाणी गटारे तुंबल्याने पाण्याचा लोंढा थेट येथील घरात घुसला. चार पाच घरात पाणी शिरल्याने येथील कुटुंबाची अक्षरशः धावपळ उडाली होती.
घरात पाणी शिरल्याचे समजताच येथील स्थानिक माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी तात्काळ चिपळूण नगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग विभागात माहिती दिली. नगरपालिका स्वच्छता विभागाचे वैभव निवाते कर्मचाऱ्यांसह त्याठिकाणी पोहचले तसेच महामार्ग विभागाचे अधिकारी देखील तात्काळ हजर झाले. त्यांनी संबंधित ठेकेदाराला देखील बोलावून घेतले आणि कामाला सुरुवात करण्यात आली. तासाभरात येथील पाण्याला मार्ग मोकळा करण्यात आला. त्यामुळे येथील पाण्याचा निचरा होऊन घरे मोकळी झाली. परंतु पहिल्याच पावसाने महामार्ग कामाचे पितळ उघडे पाडले हे मात्र निश्चित.