रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा जास्त आहे. आणि त्यातच चिपळूण तालुक्यातील शहरी भागामध्ये आता डेंग्यू आजाराचे रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा सुद्धा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असताना, डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढल्याने आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे.
चिपळूण मधील शहरातील बापट आळी परीसरामध्ये डेंग्यूचे २५ रुग्ण सापडले आहेत. अन्य काही ठिकाणी सुद्धा रुग्ण सापडू लागले आहेत. चिपळूण शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा साठून राहत असल्याने डेंग्यूचा फैलाव झाला आहे. बापट आळी परिसरातील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमधून या डेंग्यूचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. यामध्ये १५ जणांना लागण झाली असून, ते त्यातून बरे होऊन बाहेर पडले आहेत. परंतु, परिसरातील काही लोकांच्या घरामध्ये साठवून ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यांमध्ये अळ्या दृष्टीस पडल्या आहेत. त्यामुळे आणखी १० जणांना बाधा होऊन एकूण २५ डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत.
शहरात डेंग्यूसदृश विषाणू आढळून आल्याने हा आजार वेळीच थांबवण्यासाठी नगर परिषद कसोसीने प्रयत्न करत आहे. नगर परिषदेतील आरोग्य विभागाने आरोग्य विभाग आपल्या दारी मोहीमेअंतर्गत रुग्ण सापडलेल्या १० ठिकाणी पाहणी केली. रुग्ण सापडलेल्या ठिकाणी डेंग्यूसदृश विषाणू आढळून आले. त्याठिकाणी फवारणी केली. पावडर टाकण्यात आली. बिल्डिंग समोरील तसेच मागील बाजूस असणारी पाणी साठण्याची ठिकाणे, घराच्या परिसरातील बादल्या, हौद या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फवारणी करण्यात आली. तसेच डेंग्यसदृश विषाणूबाबत तेथील नागरिकांना जागरूक करण्यात आले.
चिपळूण शहरामध्ये डेंग्यूची साथ पसरण्याआधीच चिपळूण नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक महेश जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते यांनी सहकाऱ्यासकट अनेक विभागांमध्ये औषध फवारणी, धूर फवारणी केली. आणि नागरिकांना सतर्क राहून खबरदारी घेण्यास सांगितली.