नैसर्गिक आपत्ती आली की, सर्वात मोठा प्रश्न येतो स्थलांतर आणि पुनर्वसनाचा. जिल्ह्यातील चिपळूण व खेड तालुक्यात मागील वर्षी आलेल्या महापुरामध्ये अनेक लोक बेघर झाले. यावर्षी सुदैवाने मोठा पाऊस न पडल्याने तरीही पावसाळ्यापूर्वी संभाव्य धोका लक्षात घेऊन अनेक भाग दरडप्रवण म्हणून घोषित करण्यात आला आणि त्या भागातील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला होता; मात्र ग्रामीण भागातील सदस्य पुनर्वसनासाठी सहज तयार होत नाहीत. झालेच तर त्यांचे पुनर्वसन करायचे कुठे, असाही प्रश्न पुढे निर्माण होतो. त्यामुळे अनेकदा पुनर्वसन जैसे थे च राहते.
चिपळूणच्या दसपटी भागातील ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन आणि नाम फाउंडेशन या तिघांनी एकत्र येऊन पुनर्वसनाचा अनोखा प्रकल्प उभा केला आहे. शासनाने ज्यांना स्थलांतरित व्हायला सांगितले होते, अशा लोकांसाठी नाम फाउंडेशनने स्थानिक प्रशासन आणि लोकसहभागातून आकले गावात १२ आणि ओवळी गावातील ७ अशी एकूण घरे बांधून दिली आहेत. त्यामुळे दोन्ही गावातील अनेक कुटुंबांचा स्थलांतराचा प्रश्न मिटला आहे.
आकले गावातील डोंगराळ भागात वसलेल्या निंबारेवाडीत खापरे कुटुंबातील चार पिढ्या वास्तव्य करत होत्या. तेथे एकूण १२ कुटुंबे राहत होती. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात त्यांच्या वाडीला धोका निर्माण झाल्याने त्यांना स्थलांतर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. यापूर्वीही या वाडीच्या स्थलांतराबाबत चर्चा झाली होती; मात्र, योग्य जागेमुळे ग्रामस्थ स्थलांतर करण्यास तयार नव्हते. प्रशासनाने त्यावर तोडगा काढताना गावातील सुरक्षित जागेत त्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. गावातील लोकांना अल्पदरात जमीन देण्याचे आव्हान करण्यात आले. त्याला गावातील ग्रामस्थांनी होकार दिला. ज्यांचे पुनर्वसन करायचे होते, त्यांनी गावातील लोकांकडून अल्पदरात जमीन खरेदी केली.
प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी यामध्ये विशेष लक्ष घालत आणि मदतीसाठी नाम फाउंडेशनचे संस्थापक व अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्याशी संपर्क साधून आकले गावातील १२ व ओवळी गावातील ७ घरे बांधून देण्याची विनंती केली. या कामासाठी नाम फाउंडेशनचे विदर्भातील स्वयंसेवक अर्जुन जेठे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी गावातच राहून काम करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या मदतीने घरे उभारणीसाठी आवश्यक सामान अल्पदरात त्यांनी मिळवले. सहा महिन्यांत ही घरे तयार देखील झाली आहेत. थोडीशी डागडूजी शिल्लक राहिली असून, ती पूर्ण करून लवकरच घरे आपदग्रस्ताना सुपूर्द करण्यात येणार आहेत.