चिपळूणच्या शासकीय गोदामात रास्त धान्य दुकानांना वितरित करण्यासाठी आलेली सुमारे १६९ क्विंटल तूरडाळ गेले वर्षभर पडून असल्याचे उघडकीस आले आहे. पुरवठा विभागाने वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने गोदामात असलेली तूरडाळ आता कुजून जाण्याच्या मार्गावर आहे.
तालुक्यातील रेशन दुकानात वितरण करण्यासाठी वर्षभरापूर्वी शासनाकडून तूरडाळ चिपळूणमधील शासकीय गोदामात पाठवण्यात आली होती. मुळातच या तूरडाळीचा दर्जा निकृष्ट प्रतीचा होती. ती आहारात वापरण्यास अयोग्य वाटत असल्याने, रेशनिंग दुकानदारांनी तूरडाळ घेण्यासच चक्क नकार दर्शवला होता. ग्राहक अशी तूरडाळ घेत नाहीत, तूरडाळ खराब आहे, असे कारण देत रेशनिंग दुकानदारांनी तूरडाळ घेण्यास नकार दिल्याने ती तूरडाळ गोदामात इतके महिने तशीच पडून राहिली. अशी एकूण १६९ क्विंटल तूरडाळ चिपळूणच्या शासकीय गोदामात अद्यापही पडून असल्याचे उघडकीस आले आहे.
चिपळूण येथील पुरवठा विभागाने रत्नागिरीतील वरिष्ठ विभागाकडे शासनाकडून पुरवण्यात आलेली तूरडाळ निकृष्ट असून ती खाण्यास योग्य नाही, असा पत्रव्यवहार देखील केला होता. त्या सोबतच पुणे येथील पुरवठा विभागाकडे देखील तसा पत्रव्यवहार केला होता; परंतु वरिष्ठ विभागाने किंवा शासनानेदेखील त्याची काहीच दखल घेतली नाही. अखेर वर्ष उलटले तरी निकृष्ट तूरडाळीचा साठा अद्यापही येथेच पडून असून, आता ती हजारो क्विंटल डाळ कुजण्याच्या परिस्थतीत आहे.
चिपळूणचे नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी देखील अनेक उठत असणाऱ्या अफवांवर भाष्य केले असून, प्रत्यक्षात आलेली तूरडाळ ही निकृष्ट दर्जाची आणि खाण्यास योग्य नसल्याने, रेशन दुकानदार घेण्यास तयार नाहीत. अशा प्रकारचा पत्रव्यवहार वेळोवेळी संबंधित वरिष्ठ विभागाकडे करण्यात आला आहे. त्यामुळे डाळीचा साठा गोदामात मुद्दाम ठेवला आणि सडवला हे बोलणे साफ चुकीचे आहे, असे सांगितले.