प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील क्षण कायम अविस्मरणीय करण्यासाठी विविध पर्याय शोधात असतो. नामकरण, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस अशा अनेक गोष्टी विविध तर्हेने साजरा करण्याकडे सध्या सगळ्यांचा कल असतो. कोरोनामुळे तर जीवनाची काही खात्रीच राहिली नसल्याने, आहे तो क्षण सुखात आनंदात, आपल्या कुटुंब आणि मित्र मैत्रीणींसोबत घालवण्याकडे जास्त ओढा दिसत आहे.
तर काही जण आपल्या त्या स्पेशल दिवशी आपल्या मृत्यू पश्चात करण्यात येणाऱ्या गोष्टींचा देखील प्लान तयार करतात. कोणत्याही शुभ दिनी विविध प्रकारच्या करण्यात येणाऱ्या दानाला अनन्य साधारण महत्व असते. लग्नाच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त कुशिवडे ता.चिपळूण येथील भागोजी बुधाजी डिके आणि गंगाबाई भागोजी डिके यांनी देहदानाचा संकल्प केला आहे.
मृत्यूनंतर शरीर महाविद्यालयाला दान केले, तर त्या शरीरातील काही अवयव जिवंत माणसाला उपयोगी पडतील, त्यातून त्याचे जीवन सार्थकी लागेल, हा विचार करून चिपळूण तालुक्यामधील कुशिवडे गावातील रहिवासी भागोजी बुधाजी डिके आणि गंगाबाई भागोजी डिके यांचे लग्न दि. १९ फेब्रुवारी १९६२ रोजी झाले. त्यांच्या लग्नाला ६० वर्षे पूर्ण होऊन ६१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांनी देहदान करण्याचा संकल्प केला आहे.
यामध्ये त्यांचे चिरंजीव विलास भागोजी डिके व विकास भागोजी डिके यांचे योगदान फार मोलाचे आहे. हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचलित, विलास होडे स्मृती वाचनालय आरवली यांनी रविवार, दि. २० फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता कुशिवडे येथे भागोजी बुधाजी डिके यांच्या निवासस्थानी तो कार्यक्रम आयोजित केला आहे.