रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आलेला. त्यामध्ये नद्यांचा गाळ अनेक वर्षे उपसाच न केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने, पाणी रस्त्यावर येऊन वस्तीमध्ये शिरले. आणि संपूर्ण हाहाकार माजला. अनेकांची घरेच्या घरे देखील वाहून गेली तर अनेकांच्या वस्तू, कागदपत्रे, मालमत्ता पाण्याबरोबर वाहून गेली. गटारे मोठ्या प्रमाणात तुंबल्याने, गटाराचा सर्व कचरा घरांमध्ये गेला, रस्त्यावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे यावर्षी पावसाच्या आधीच नगर पालिकेने स्वच्छतेचे शस्त्र हातात घेतले आहे.
चिपळुणामध्ये नालेसफाईला सुरूवात करण्यात आली आहे. पावसाळा दोन महिन्यावर येवून ठेपला असल्याने येथील नगर पालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरूवात केली आहे. ही मोहीम दि. १० मे पर्यंत शहरात सुरू राहणार आहे. त्यामुळे मागील वर्षी सारखे गटारे तुंबण्याचा प्रश्न उरणार नाही. आणि पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. नाले वेळीच साफ केल्याने रोगराई पसरण्याचा धोका कमी होईल.
पावसाळ्यात डोंगरभारातून येणारे पाणी सुरळीत पुढे सरकावे, रोगराई पसरू नये यासाठी नगर पालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहर परिसरात नाले सफाई केली जाते. गतवर्षी २२ जुलै २०२१ रोजी चिपळूणला महापुराचा फटका बसला. वाशिष्ठी व शिवनदीचे पाणी शहरात घुसून मोठी हानी झाली. तर पाण्यासोबत तसेच डोंगर भारातून वाहून आलेली माती व गाळ, कचरा शहरातील गटारे व नाल्यांमध्ये आल्याने ही गटारे व नाले तुडुंब झाली होती. त्यामुळे यावर्षी मान्सूनपूर्व नाले सफाई करताना नगर पालिका प्रशासन, आरोग्य विभाग यांना मोठी कसरत करावी लागत आहे.