महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत कोकण विभागातून चिपळूण पालिकेने प्रथम क्रमांक पटकावला. ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या शहरातून ही निवड करण्यात आली. या अभियानात चिपळूण पालिकेने कोकण विभागात बाजी मारल्याने शासनाकडून ७५ लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे, यामध्ये लोकसहभाग वाढावा, लोकांमध्ये पर्यावरणाची चळवळ रुजावी, वाढते जागतिक तापमान कमी होण्यासाठी शासनाने माझी वसुंधरा अभियान राबवले आहे. या अभियानअंतर्गत चिपळूण पालिकेने गेल्या वर्षभरात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवले.
यामध्ये फुलपाखरू उद्यान, कॉर्नर बगिचा, पडीक जागेचे सुशोभीकरणाचा समावेश आहे. विविध उद्यानेही विकसित करून तेथे विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये काही संस्था व कंपन्यांचा सहभाग घेतला. याशिवाय ‘पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले. पर्यावरण गणेशोत्सव स्पर्धा घेऊन नागरिकांना पर्यावरण रक्षणासाठी प्रोत्साहन दिले. सामूहिक स्वच्छता अभियान राबवताना विविध संस्था, शाळा, महाविद्यालये, मंडळे आदी विविध घटकांचा सहभाग घेतला.
शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली. तसेच नागरिकांनी आपल्या घर परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी पालिकेच्या वतीने मोफत झाडे उपलब्ध करून देण्यात आली. या साऱ्या उपक्रमांची दखल घेत चिपळूण पालिकेची कोकण विभागातून प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली. यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.