28.5 C
Ratnagiri
Saturday, November 23, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeKhedगुहागरात नवा द्विस्ट, भास्करशेठच्या चिरंजीवांनी अचानक फॉर्म भरला

गुहागरात नवा द्विस्ट, भास्करशेठच्या चिरंजीवांनी अचानक फॉर्म भरला

अचानक भरलेला अर्ज हा एका 'मोठ्या राजकीय खेळी'चा भाग असू शकतो अशी चर्चा सुरु झाली आहे.

गुहागर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार आणि ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव यांनी २४ ऑक्टोबरला मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, सोमवारी २८ रोजी सकाळी जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनीही आपला अर्ज याच मतदारसंघात दाखल केल्याने चिपळूण-गुहागरमधील निवडणुकीच्या राजकारणात नवा ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. वडिलांच्या विरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागील नेमके गौडबंगाल तरी काय याची मोठी चर्चा सुरु झाली आहे. आमदार भास्कर जाधव यांना आपले राजकीय वारसदार म्हणून विक्रांत यांना पुढे आणायचे आहे. त्यांची ही इच्छा आणि प्रयत्न लपून राहिलेले नाहीत. या विधानसभा निवडणुकीतही गुहागरमधून विक्रांत आणि ते स्वतः चिपळूणमधून निवडणूक लढवू शकतात असा अंदाज आणि चर्चा होती. मात्र पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून भास्करराव जाधव यांना उमेदवारी दिली ती ताकदीचा उमेदवार म्हणून आणि त्याचबरोबर ‘रिस्क’ नको या हेतूने.विक्रांत नवखे असल्यामुळे निकालावर परिणाम होऊ शकतो अशी पक्ष नेतृत्वाला शक्यता वाटत असल्याने आमदार भास्कर जाधव हाच हुकमी एक्का म्हणून त्यांना पुढे चाल देण्यात आली असे आता बोलले जात आहे.

मोठी राजकीय खेळी? – मात्र गेल्या काही दिवसात या मतदारसंघात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर विक्रांत जाधव यांनी सोमवारी गुहागरमधूनच अचानक भरलेला अर्ज हा एका ‘मोठ्या राजकीय खेळी’चा भाग असू शकतो अशी चर्चा सुरु झाली आहे. गुहागर मतदारसंघात भास्करराव जाधव यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारापुढे तेवढ्याच ताकदीचा उमेदवार देणे महायुतीने टाळले किंवा त्याबाबत घोळ घालून उशीर केला. या परिस्थितीत शिंदे गट शिवसेना आणि भाजप यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरु राहील. ते मनापासून एकत्र येणार नाहीत आणि झोकून देऊन प्रचारात उतरतील असे वाटत नाही.

भाजपचे नेते रिंगणात ? – शिंदे गट शिवसेनेने राजेश बेंडल यांना उमेदवारी दिली आहे, पण त्याचवेळी भाजपचे तरुण, उत्साही तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, आणखी एक प्रमुख पदाधिकारी संतोष जैतापकर हे मंगळवारी अर्ज भरणार आहेत असे सांगितले जाते. महायुतीचे घटक पक्ष असलेला आरपीआय आठवले गटाचे संदेश मोहिते अर्ज दाखल करणार आहेत. म्हणजे मुळात जी काही फाटाफ ट होणार आहे ती महायुतीत. त्यातच मनसेचा उमेदवार रिंगणात आहे. थोडक्यात भास्कर जाधव यांची बाजू अभेद्य दिसते तर जी काही पडझड होईल ती शत्रू पक्षात. वरील सर्वांनी फॉर्म भरले आणि ते खरोखरच रिंगणांत राहिले तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ही निवडणूक बरीचशी सोपी ठरेल. याचांच लाभ घेऊन आणि एबी फॉर्म मधील तांत्रिक बाबींचा उपयोग करून आयत्यावेळी आमदार भास्कर जाधव माघार घेऊन विक्रांत जाधव मशाल चिन्हावरच ठाकरे सेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात राहतील अशीही चर्चा ऐकण्यास मिळत आहे अशी राजकीय खेळी होण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र सुर्वे, जैतापकर, मोहिते किंवा युतीची मतं खाणारे कोणीही रिंगणात नसतील आणि बेंडल यांच्याशी थेट लढत असेल तर मात्र भास्करराव स्वतःच रिंगणात कायम राहतील असेही बोलले जात आहे. मनसेचे प्रमोद गांधी हे महायुतीचीच मतं खाण्याची शक्यता आहे. लोकसभेला मनसेने भाजप युतीला पाठिंबा दिल्याने त्यांची काहीशी अडचण होण्याची श्यक्यता वर्तवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular