सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना भाजपाच्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत शिवसेना नेते भास्करराव जाधव यांच्यावर चांगलच तोंडसुख घेऊन निशाणा साधला आहे. या व्हिडीओतून शाळेच्या गणवेशातील हे विद्यार्थी दिसत आहेत. हा व्हिडिओ कोकणातील मिर्ले गावातील असून भास्करराव जाधव यांच्या मतदारसंघातील हे गाव असल्यानं चित्रा वाघ यांनी भास्करराव जाधवांवर सडकून टीका केली आहे.
लहान मुलं ही मिर्ले गावातील असून मुलांना शाळेत जाण्यासाठीचा झोलाईदेवी-धनगरवाडी रस्ता अजूनही केलेला नाही. पावसाळ्यात या लेकरांना मोठ्या संकटांना समोर जात या परिसरातून प्रवास करावा लागतो. तिथे जंगली श्वापदांची देखील भिती आहे. मात्र या भागात सरपंच, आमदार खासदारापर्यंत शिवसेनेची सत्ता असतानाही वारंवार मागणी करून कोणतीही ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. हा रस्ता जिल्हा परिषदेकडून व्हावा असं कागदोपत्री असतानाही अद्याप सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मात्र येथील शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्करराव जाधव मुंबईत मात्र सगळ्यांना ज्ञान पाजळत असतात. हे दिव्याखाली अंधार असल्यासारखे झाले आहे.
जाधवांना त्यांच्या मतदार संघातील कारभार दिसत नाही का? असा थेट सवाल त्यांनी केला आहे. जोरदार पाऊस आला की मुलांची शाळा बंद होते. भितीमुळे मुलांना शाळेत पाठवले जात नाही. या भागांत वृद्धांना प्रवास करताना अडचणी येतात हे आमदारांना दिसत नाही का? जिल्हा परिषेदेत तुमची सत्ता आहे. त्यामुळे मुंबईत बसून तोंडाची वाफ विरोधकांच्या मागे घालवण्यापेक्षा हा जोर मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे लावा आणि निधी आणून रस्त्याचे काम मार्गी लावा, असा सूचक सल्ला त्यांनी दिला आहे.