केंद्र शासनाच्या गृह विभागाद्वारे ई-गव्हर्नन्स या संकल्पनेला वाव देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केलेल्या सिटीझन पोर्टल सेवेचा रत्नागिरीत फज्जा उडाला आहे. हे पोर्टल दहा-दहा दिवस अपडेट होत नसल्याने या पोर्टलच्या सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचेदेखील या पोर्टलकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्थानकातील एफआयआर या पोर्टलवर अपलोड होत नसल्याचे चित्र पहायला मिळतं आहे. पोलीस खात्यात आमूलाग्र बदल करीत नवनवीन तंत्रज्ञान केंद्र व राज्य शासनाने अंमलात आणले आहे.
पोलीस खात्यावरील कामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी अनेक ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये जनतेने तक्रार कशी करावी, कुठे करावी, कोणत्या अधिकाऱ्याकडे करावी, याबाबत काय मजकूर लिहावा याची माहिती अनेकांना नसते. तसेच दिलेल्या तक्रारीवर काय कारवाई झाली, याबाबत माहिती नसते किंवा गैरसमजुतीमुळे अथवा अनावश्यक भीतीमुळे बहुतांश वेळेस घडलेल्या अनुचित प्रकाराची माहिती पोलीस विभागाला नागरिकांकडून देण्यात येत नाही. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी गृहविभागाने डिजिटल पोलीस संकेतस्थळाच्या माध्यमातून उपक्रम सुरू केला.
ऑनलाईन सेवांचा उपयोग – डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना सायबर गुन्ह्यांसंबंधित माहिती देण्यासाठी, हरविलेल्या व्यक्तींची माहिती, वाहनांचे ना-हरकत प्रमाणपत्र, उद्घोषित फरार आरोपींची माहिती त्यात राहील. राज्य निवड सूचीमध्ये महाराष्ट्र राज्याची निवड केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांचे नागरिकांसाठी उपलब्ध असलेले सिटीझन पोर्टलच्या माध्यमातून कुठूनही ऑनलाइन तक्रार दाखल करू शकतात. तसेच इतरही ऑनलाइन सेवांचा उपयोग घेता येते.
नागरिकांना महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदणी करणे, शोधा आणि पाहामध्ये तक्रारीची सद्यस्थिती पाहणे, नागरिकांकडून सूचना अथवा गुप्त माहिती देता येते. गहाळ मोबाईलची सूचना, हरविलेल्या व्यक्तींची माहिती, अनोळखी मृतदेहाची माहिती, अटक व्यक्तींची माहिती, प्रकाशित दखलपात्र प्रथम खबर, वाहन चौकशी, नागरिकांच्या प्रतिक्रिया अशा सेवा उपलब्ध आहेत. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात हे पोर्टल नियमित अपडेट होत नसल्याने दाखल झालेले दखलपात्र गुन्हे व अन्य माहिती ही सर्वसामान्य जनतेला मिळत नाही.
माहिती मिळत नसल्याची ओरड – ही कागदपत्रे शासनाने जनतेसाठी खुली करून दिलेली असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सिटीझन पोर्टल अपडेट होत नसल्याची तक्रार सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे.