महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त व्हावा यासाठी २७ ऑगस्ट पासून महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अद्यापही अवजड वाहतूक सुरूच असून खड्डे बुजवण्याच्या कामाला देखील गती मिळालेली नाही. त्यामुळे गणेशोत्सवात खड्ड्यांचे विघ्न कायम राहणार की काय? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण प्रगतिपथावर असले तरी अनेक ठिकाणी अद्यापही कामाला ब्रेक लागलेला आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते वगळता अन्य सर्व रस्त्यावर तसेच नव्याने तयार केलेले बायपास व सर्विस रोडवर देखील भयंकर असे खड्डे पडले असून वाहतूक करणे कठीण बनले आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे अपघातांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे काही दिवसांवर आलेल्या गणपती उत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अवजड वाहतुकीला बंदी – गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशभक्त कोकणात येणार असून महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने महामार्ग सुस्थितीत असणे आवश्यक आहे. साहजिकच खड्डे बुजवून रस्ते चकाचक करण्यासाठी ठेकेदार तसेच प्रशासनाला सूचना देण्यात आले आहेत. खड्डे बुजवण्याचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे म्हणून २७ ऑगस्ट पासून महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्याची घोषणा ना. रवींद्र चव्हाण यांनी केली होती.
तर खड्ड्यांचे विघ्न – अवजड वाहतुकीला बंदी घालून देखील महामार्गावरून अवजड वाहतूक अद्याप सुरूच आहे. तसेच खड्डे बुजवण्याचे काम देखील वेगाने सुरू झालेले नाही. खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्यासाठी लागणारी यंत्रणा देखील येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेली नाही. गणेशोत्सवाला आता काही दिवस शिल्लक असल्याने या दिवसात खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण होणे कठीण बनले आहे. त्यामुळे गणेशोत्सवात खड्ड्यांचे विघ्न कायम राहण्याची शक्यता आहे